आप हमें अच्छे लगने लगे...
By admin | Published: February 15, 2015 12:42 AM2015-02-15T00:42:31+5:302015-02-15T00:42:31+5:30
१० फेब्रुवारी २०१५ रोजी केवळ दिल्लीतच नव्हे, तर देशभर ठिकठिकाणी या घोषणागीतावर हजारो लोकांनी बेभान होऊन ताल धरला, तेव्हा काही तरी वेगळे घडते आहे,
१० फेब्रुवारी २०१५ रोजी केवळ दिल्लीतच नव्हे, तर देशभर ठिकठिकाणी या घोषणागीतावर हजारो लोकांनी बेभान होऊन ताल धरला, तेव्हा काही तरी वेगळे घडते आहे, याची जाणीव झाली. विशेष म्हणजे, जे आम आदमी पक्ष म्हणजेच ‘आप’चे कार्यकर्ते नाहीत, अशी सामान्य जनताही मनोमन हा उत्सव साजरा करत होती. बाजारपेठा, कार्यालये, लोकल्स, शाळा-कॉलेजे, हॉटेल्स सर्वत्र एकच चर्चा होती, ‘आप’च्या विजयाची!
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली. ती हटवण्यात आल्यावर जनता पक्षाची स्थापना होऊन झालेला विजय माझ्यासारख्या लाखो तरुणांनी तेव्हा असाच बेहोशीत साजरा केला होता. आसाममधील आसाम गण परिषद व आसू संघटनेने चळवळ करून प्रस्थापित काँग्रेस पक्षास हटवून सत्ता मिळवली. ममता बॅनर्जींनी तीन दशकांहून अधिक काळची डाव्या आघाडीची पश्चिम बंगालमधली सत्ता उलथवून टाकली, ती सर्वहारांच्या समर्थनाच्या बळावरच. त्यातही ‘आप’चे वैशिष्ट्य असे की, त्यांचा राजकीय पक्ष फक्त दोन वर्षांचा. वर्षभरात सत्ता मिळवून विक्र मी काळात त्यांनी स्वेच्छेने सत्तेचा त्याग केला. पण वनवासात न जाता ते मूकपणे काम करत राहिले.
दिल्ली निवडणुकांच्या रणधुमाळीत स्वत: अरविंद केजरीवाल चॅनेलवर चर्चा करत बसले नाहीत. इतर राजकीय नेत्यांप्रमाणे त्यांनी प्रसारमाध्यमांची हांजी हांजी केली नाही. उलट बड्या उद्योगपतींनी माध्यमे आपल्या मुठीत ठेवली असल्याबद्दल तोफ डागण्याचे धाडस दाखवले. चॅनेलवर चमकोगिरी करणारे स्वयंघोषित नेते/प्रवक्ते कुठे आणि माध्यमांपासून दूर राहून, जनतेत मिसळून, नागरी समस्यांशी एकरूप होणारे केजरीवाल कुठे! त्यांचे निष्ठावंत सहकारी आणि कार्यकर्ते-चिंतक योगेंद्र यादव यांना तर एका उर्मट गोस्वामीने चॅनेलवरील चर्चेत बोलूच दिले नाही. त्यापासून प्रेरणा घेत भाजपा व काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी ‘आप’वर झोड उठवली. तरीसुद्धा न चिडता योगेंद्रजी ठामपणे उत्तर देत होते. ‘आप’ला विजय मिळताच, त्या उर्मट सूत्रसंचालकाने आपला पवित्रा बदलून, ‘करवटें बदलते रहे सारी रात हम, ‘आप’ की कसम’ असे म्हणण्यास सुरुवात केली. लोक हे सर्व पाहत असतात...
विशेष म्हणजे, ‘डावी वा उजवी विचारसरणी वगैरे मला ठाऊक नाही. मला लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडवायचे आहेत. रिश्वतखोरी थांबवायची आहे. व्हीआयपी कल्चर संपुष्टात आणायचे आहे. ४९ दिवसांच्या सत्ताकाळात आम्ही महागाई कमी करून दाखवली आहे आणि ती या वेळीही कमी करून दाखवू’, ही केजरीवाल यांची भाषा जनतेला अपील झाली.
जातपात, धर्म, प्रांत, भाषा या वादांशी आम्हाला घेणेदेणे नाही, ही ‘आप’ची भूमिका आहे. झोपडपट्टीवासीयांना ‘तुम्ही दलित वा ओबीसी आहात, म्हणून हलाखीचे जगणे तुमच्या नशिबी आहे’, असे त्यांनी सांगितले नाही. तर ‘सरकारी बेपर्वाईमुळे तुमची ही अवस्था आहे’, असे सांगितले. ‘तुम्ही हिंदू, मुसलमान वा शीख आहात म्हणून तुमची कामे केली जात नाहीत’, असे न सांगता, ‘अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार यास जबाबदार आहे’, असे त्यांनी सांगितले. घरवापसी, लव्ह जिहाद, हिंदू-मुस्लीम वाद हे मुद्देच त्यांनी समृद्ध अडगळीत टाकून दिले.
दिल्लीत हिंदू ८१%, मुस्लीम ११% व शीख ५% आहेत. मात्र दंगली, दहशतवाद, या धर्मावर वा त्या जातीवर कसा अन्याय-अत्याचार होत आहे, अशी भावनाप्रक्षोभी भाषा करण्यात आली नाही. अस्मितेचे/विखारीपणाचे राजकारण बाजूला ठेवण्यात आले. एवढे असूनही दलितांनी बसपाला न देता ‘आप’ला मते दिली. हिंदूंनी, हिंदुत्ववाद्यांना व शिखांनी अकाली दलाच्या मित्राला, म्हणजे भाजपाला मते दिली नाहीत. तर मुसलमानांनीही काँग्रेसऐवजी आम आदमीच्या बाजूने कौल दिला. ओबीसींनीही झाडूवर मोहोर उमटवली. एखादा पक्ष भेदाभेदांच्या भिंती पाडून सर्व समाजाचा कसा होतो, याचा दाखला ‘आप’ने ७० पैकी ६७ जागा मिळवून दिला.
सत्ताधारी व विरोधी पक्षांना हा चांगलाच धडा आहे. घराणेशाही, व्यक्तिकेंद्रित अथवा व्होट बँकेचे, मनीबॅगचे राजकारण सर्वांच्या अंगात मुरले आहे. लालू, मुलायम, मायावती, जयललिता, करुणानिधी वगैरे अनेकांचे पक्ष प्रायव्हेट लि. कंपन्या बनले आहेत. केवळ कमळाबाईला डिवचण्याच्या हेतूने ‘आप’वर स्तुतिसुमने उधळणाऱ्या शिवसेनेने मुंबई महानगरपालिका अक्षरश: धुऊन काढली आहे. या सर्वांनी ‘आप’पासून बोध घेऊन आपापले वर्तन सुधारावे, अशी अपेक्षा आहे. आज मनसे खचला आहे. पण नुसतेच स्टाइलभाय न बनता, मान मोडून काम केल्यास, तोही पुन्हा उभारी घेऊ शकेल. कम्युनिस्टांनीही खचून जाऊ नये. पुस्तकी पाठ न पढवता, जनतेच्या साध्या साध्या अडचणी दूर करा, लोक उद्या त्यांनाही आपलेसे करतील. युरोपात हे घडले आहे. त्यामुळे दुसऱ्यांची बुराई करण्यात वेळ न दवडता सच्चाईने जनसेवा केल्यास, जनतेच्या प्रश्नांशी जोडून घेतल्यास, लोक ‘आप हमें अच्छे लगने लगे’, असे निश्चितच म्हणू लागतील...
स्त्रियांचीही नापसंती
२०१३ च्या तुलनेत यंदा ‘आप’ला महिलांचे ४ लाख ७१ हजार एवढे अधिक मतदान झाले. वास्तविक लोकसभेच्या वेळी महिलांनी भाजपाला भरभरून मते दिली होती. परंतु सरकारकडून दिल्लीकर स्त्रियांची घोर निराशा झाली. ‘निर्भया’ प्रकरणामुळे काँग्रेसकडे त्या वळण्याची शक्यता नव्हतीच! परंतु हिंदू स्त्रियांनी चार-चार मुलांना जन्म द्यावा, अशी भाजपा खासदार साक्षीमहाराज प्रभृतींची वक्तव्ये महिलावर्गास बिलकूल आवडली नाहीत.
निवडणूक प्रचारात ‘आप’ने तर महिला सुरक्षा दल उभारण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपा स्त्रियांच्या ‘रक्षणा’चे आश्वासन देतो. तर ‘आप’ने सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित राहण्याचा महिलांचा अधिकारच मान्य केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजना ज्योती यांच्या ‘रामजादे’ विरु द्ध ‘हरामजादे’ या वक्तव्यामुळे स्त्रिया व मुस्लिमांमध्ये तिडीक उत्पन्न झाली.
आत्मपरीक्षण करायला हवे
इतका दारु ण पराभव झाल्यानंतरदेखील भाजपाचे प्रवक्ते म्हणत होते की, बघा, आम्हाला २०१३ मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ३३% मते पडली होती. ती या वेळी ३२% पडली आहेत. याचा अर्थ, आमची नव्हे, तर काँग्रेस व बसपाची मते ‘आप’कडे ट्रान्स्फर झाली आहेत. मात्र ही आकडेवारी खरी असली, तरी त्याचा एकच एक अर्थ लावणे चुकीचे ठरेल.
तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सातच्या सात जागा मिळवताना, भाजपाने आणखी १४% मते घेतली होती. ही मते या वेळी भाजपाला का मिळाली नाहीत? ती जादा मते मोदी लाटेमुळे मिळाली. पण काँग्रेसवाले जसे इंदिरा-राजीव-सोनिया गांधी यांच्या करिश्म्याचा लाभ घेऊन आपण स्वत: काही काम करायचे नाहीत, तो दोष भाजपाच्या अंगवळणी पडू लागला आहे का, याचे आत्मपरीक्षण झाले पाहिजे.
गेल्या वेळी मुख्यमंत्रीपदाचा त्याग केल्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यावर जनता उखडली होती. वर चांगला आहे, पण त्याने घरगृहस्थी सोडून निघून जावे, हे तिला पटले नाही. पण याचा अर्थ वर, म्हणजे इथे केजरीवाल, हे सज्जन व चांगले नेते आहेत, हीच भावना होती. त्यांच्यावरचा लोकांचा राग प्रेमातलाच होता. भाजपावाल्यांना हे कळले नाही. मात्र केजरीवाल यांनी प्रथम जनतेची माफी मागितली. ‘जो भी हो जाए, हमने ये तो सीख लिया है की कुर्सी मत छोडो’, असे उद्गारही त्यांनी काढले.
केजरीवाल यांनी जाहीरनामा तयार करताना लोकांना सहभागी करून घेतले. महिला सुरक्षा, शिक्षण, पाणी, वीज, रोजगार या मुद्द्यांवर वस्त्यावस्त्यांत जाऊन ‘दिल्ली डायलॉग’ या कार्यक्र माच्या माध्यमातून जनसामान्यांशी चर्चा केली. त्याची टिपणे काढून ७० कलमी कार्यक्र म/अजेंडा तयार करण्यात आला. #े४ाा’ी१ेंल्ल यासारख्या हॅशटॅगमधून सोशल मीडियावर केजरीवाल यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावीपणे जनतेसमोर ठेवले गेले. त्यामुळे खासकरून लक्षावधी तरु ण ‘आप’कडे खेचले गेले. तर खुद्द केजरीवाल यांनी ७० मतदारसंघांत मिळून ११० जनसभा घेतल्या.
हेमंत देसाई