भारतीयत्वाचा अभिमान बाळगणार नाही, तोपर्यंत भारत महान होणार तरी कसा?

By विजय दर्डा | Published: September 3, 2018 03:58 AM2018-09-03T03:58:52+5:302018-09-03T04:04:35+5:30

मी जगात कुठेही गेलो की तेथील संस्कृती, लोकजीवन व सामाजिक परंपरा जाणून, समजून घेण्याचा अवश्य प्रयत्न करतो. तेथील सर्वसामान्य लोकांना भेटतो.

The young generation will not boast of Indianism, how long will India be great? | भारतीयत्वाचा अभिमान बाळगणार नाही, तोपर्यंत भारत महान होणार तरी कसा?

भारतीयत्वाचा अभिमान बाळगणार नाही, तोपर्यंत भारत महान होणार तरी कसा?

googlenewsNext

मी जगात कुठेही गेलो की तेथील संस्कृती, लोकजीवन व सामाजिक परंपरा जाणून, समजून घेण्याचा अवश्य प्रयत्न करतो. तेथील सर्वसामान्य लोकांना भेटतो. अनेक देशांमध्ये गेल्यावर मला असे जाणवले की, जगातील बहुतांश देशातील लोकांना आपल्या देशाचा अभिमान असतो व आपली भाषा, संस्कृती व लोकजीवनाविषयी ते खूपच जागरूक असतात. तुम्ही जपान, चीन, रशिया आणि अमेरिकेखेरीज अगदी लहान देशात जरी गेलात, तरी तेथील संस्कृती जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे तुम्हाला दिसेल. तेथील लोकांमध्ये आपल्या देशाविषयी कमालीचे प्रेम दिसून येते.
पण भारतात मात्र खूपच वाईट स्थिती असल्याचे दिसते. आपण आपल्या भाषेचा व वेशभूषेचा मोठ्या झपाट्याने त्याग करत आहोत. आपल्या संस्कृतीशीही आपली फारकत होत आहे. भारतात देशाभिमानाचा अभाव दिसून येतो. अलीकडेच एका फ्रेंच पत्रकाराचा एक व्हिडीओ माझ्याकडे आला. त्या
व्हिडीओ संदेशात तो फ्रेंच पत्रकार म्हणतो की, भारतामध्ये ‘महा-राष्ट्र’ (सुपर नेशन) बनण्याची क्षमता आहे, पण सध्या भारत फक्त इतरांची नक्कल करण्यात गुंग आहे, हे दुर्दैव आहे.
या फ्रेंच पत्रकाराचे निरीक्षण बरोबर आहे, असे मलाही वाटते. प्राचीन काळी भारतात तक्षशिला, नालंदा व विक्रमशिला यासारखी विद्यापीठे होती. तेथे जगभरातून विद्वान अध्ययन आणि अध्यापनासाठी येत असत. आज ज्याला जागतिक तोडीचे म्हणता येईल, असे एकही विद्यापीठ आपल्याकडे नाही. गणितापासून ते खगोलविज्ञान आणि आध्यात्मापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये भारताने बहुमोल शोध व ज्ञान भारताने जगाला दिले. आता मात्र हिंदुस्तानात असे काही होताना दिसत नाही. आपण जणू काही फक्त ‘एक्स्पोर्ट क्वालिटी’ची पिढी तयार करत आहोत! प्रत्येकाला शिकण्यासाठी किंवा शिकून झाल्यावर अमेरिकेस जावेसे वाटते. असे का?
ब्रिटनला भारतावर राज्य करताना पूर्ण कल्पना होती की, बळकट असलेला भाषिक व सांस्कृतिक वारसा खिळखिळा होणार नाही, तोपर्यंत भारताला खऱ्या अर्थी गुलामीत ठेवता येणार नाही. म्हणूनच ब्रिटिश शिक्षणतज्ज्ञ लॉर्ड मेकॉले यांनी ब्रिटिश साम्राज्यधार्जिणा नोकरदार वर्ग तयार करण्याच्या शिक्षण पद्धतीची मुहूर्तमेढ रोवली. दि. २ फेब्रुवारी १८३५ रोजी कोलकाता येथे लॉर्ड मेकॉले म्हणाले होते की, संस्कृत व अरबी या प्राचीन भाषा आहेत व भारताला आधुनिक बनवायचे असेल, तर त्याला इंग्रजी शिकवावे लागेल, नवी नीतिमूल्ये शिकवावी लागतील.
वास्तविक, मेकॉले यांच्या या विचारामागे भारताच्या हिताचा विचार मुळीच नव्हता. भारताने आपला इतिहास विसरून जावा आणि त्या इंग्रजीच जगात सर्वोत्तम असे वाटू लागावे, हा त्यामागचा अंतस्थ हेतू होता. इंग्रजी शिकले की, भारतात इंग्रजी संस्कृती आपोआप रुजेल, हे त्यामागचे गणित होते!
मेकॉले यांच्या या शिक्षणपद्धतीतून पुढे इंग्रजी शिक्षण हेच सर्वोच्च मानणाºया पिढ्या तयार होऊ लागल्या. भारतीय शेक्सपिअर वाचू लागले, वर्ड्सवर्थ अभ्यासू लागले व किट््सच्या कविता मुखोद््गत करू लागले. ज्याच्या तोडीचा अन्य प्रतिभावान कवी अन्य कोणी झाला नाही, असे जग आज ज्याच्याविषयी मानते, तो कालिदास आपल्या अभ्यासक्रमातून बाहेर फेकला गेला. मेकॉले यांच्या इंग्रजी शिक्षण पद्धतीने संस्कृत हळूहळू मृतवत होत गेली.
आपण मुलांना पाश्चात्य महापुरुषांचे
महात्म्य शिकवितो, पण छत्रपती शिवाजी महाराज व राणा प्रताप यांच्यासारख्या स्वदेशी शूरवीरांची आपण त्यांना नीट ओळखही करून देत नाही, हे केवढे मोठे दुर्दैव आहे. गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान आपल्या जीवनातून केव्हाच हद्दपार झाले आहे. महर्षी अरविंद तर आपल्या जणू विस्मृतीतच गेले आहेत.
देशातील तरुण पिढीला आपली संस्कृती, आध्यात्मिक विचार आणि तत्त्वज्ञान यांचे शिक्षण दिले नाही, तर ती परिपूर्ण भारतीय कशी बरं होईल? मुलांना आपल्या प्राचीन संस्कृतीचे व ज्ञानाचे शिक्षण देण्यात आपली शिक्षणपद्धती पूर्णपणे कुचकामी ठरली आहे, हे निर्विवाद सत्य आहे. परिणामी, आपल्या मुलांना भारताहून अमेरिका प्रिय वाटू लागली आहे, त्यांना युरोप जास्त चांगला वाटू लागला आहे. ते भारतावर प्रेम जरूर करतात, पण त्यांच्यात भारतीयत्वचा अभाव नक्कीच जाणवतो. आपल्या देशाने शोधून काढलेल्या प्राणायामाबद्दल, ध्यानविधींविषयी त्यांना काही माहीत नाही. मुळे कापलेला वृक्ष फळा-फुलांनी कधीच बहरत नाही, हे कायम लक्षात ठेवायला हवे! भारताची युवा पिढी भारतीयत्वाचा अभिमान बाळगणार नाही, तोपर्यंत भारत महान होणार तरी कसा?

Web Title: The young generation will not boast of Indianism, how long will India be great?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत