वेदनेत बुडालेली जोया आणि जाराची जिंदगी!
By विजय दर्डा | Published: November 6, 2023 08:56 AM2023-11-06T08:56:34+5:302023-11-06T08:57:09+5:30
युद्ध नेहमीच निरपराधांच्या रक्ताने माखलेले असते याला इतिहास साक्षी आहे. आधी हमास आणि आता इस्रायलच्या हल्ल्यातही तेच होते आहे.
- डॉ. विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे; परंतु, गाझा पट्टीतील एका मर्मभेदी घटनेने मला आतून बेचैन केले आहे. बॉम्बवर्षावात उद्ध्वस्त झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मदत कर्मचाऱ्यांना एक लहान मुलगी सापडली. रक्ताने माखलेली ही मुलगी कोण आहे, हे कोणालाच माहीत नव्हते. तिला तत्काळ जवळच्या इस्पितळात पोहोचवले गेले. रक्ताने भरलेला तिचा चेहरा तेथे पुसला गेला; तेव्हा समोरच खाटेवर घायाळ अवस्थेत पडलेल्या जोया नावाच्या मुलीने आरोळी दिली की ती तिची बहीण जारा आहे. असहनीय अशा वेदनेमध्येही दोघींच्या चेहऱ्यावर स्मितची एक अस्पष्ट रेषा उमटली. या मुलींचे माता-पिता कदाचित बॉम्बवर्षावाचे शिकार झाले असतील. जरा विचार करा, या किंवा अशा दुसऱ्या मुलांचे आयुष्य यापुढे कसे जाईल?
हमास इस्रायलर अग्निबाण फेकले तेव्हा मी शंका व्यक्त केलीच होती की इस्रायल आता बदला घेईल आणि त्याचे परिणाम गाझा पट्टीत राहणाऱ्या निरपराध लोकांना भोगावे लागतील. आकाशातून पडणारे बॉम्ब आणि अग्निबाण है हमासचे अड्डे कुठे आहेत आणि सामान्य माणसे कोठे राहतात यात फरक करू शकत नाहीत. माझी शंका खरी ठरत आहे. हजारो लोक मारले गेले असून, चार हजारपेक्षा जास्त मुले मृत्युमुखी पडली आहेत. हजारो लोक जिवंतपणी प्रेतवत झाले, कारण कुणाचा हात तुटला, तर कुणाचा पाय कुणाचे डोळे गेले. हमासने जे केले ते क्रौर्य होते आणि बदला घेताना इस्रायल जे करत आहे तेही नृशंस क्रूरताच आहे.
गाझा पट्टीत अडकलेले लोक ना माझे भाऊ, ना बहीण, ना नातलग; पण जसा मी आहे तशीच ती माणसे आहेत हे मी कसे विसरू? मी महावीर आणि भगवान बुद्ध, महात्मा गांधींच्या देशात राहतो; ज्यांच्यासाठी माणुसकी हा सर्वांत मोठा धर्म राहिला. ज्या 'देशाने 'वसुधैव कुटुंबकम्' म्हणून संपूर्ण दुनियेला आपले नातेवाईक मानले, त्या देशाचा मी नागरिक आहे. जगात कुठेही जर माणुसकीचा बळी गेला तर आमच्या डोळ्यांत पाणी येणारच. हिटलरने ज्यूंचे पाहिली आहे. ज्यूंच्या हृदयात आजही ती आग धुमसते आहे. बदला घेताना पेटणाऱ्या आगीत सगळे काही खाक होत असते हे समजून घेतले पाहिजे. म्हणून ती आग विझवली पाहिजे, जाती, धर्म आणि वंश विसरला पाहिजे. माणुसकी हृदयाशी धरली पाहिजे. तेव्हाच आपण जगाला एक कुटुंब म्हणवू शकू, परंतु जग विचारांच्या गर्तेत सापडले आहे. त्याचे घृणास्पद रूप आपण सध्या पाहतो आहोत.
मी गाझा पट्टी पाहिली आहे. तेथे गेलो आहे. सुमारे ४१ किलोमीटर लांब आणि १० किलोमीटर रुंद असा हा प्रदेश जगातल्या दाट लोकवस्तीपैकी एक आहे. आता छायाचित्रे पाहून माझे मन वाईट तन्हेने रुदन करीत आहे. इस्रायलच्या बॉम्बवर्षावात बराचसा भाग उद्ध्वस्त झाला आहे. एका इस्पितळावर अग्निबाण पडला आणि ५०० पेक्षा जास्त रुग्ण मारले गेले. अल शिफा नावाच्या दुसऱ्या एका इस्पितळात ५५ हजारपेक्षा जास्त लोक आश्रयाला आलेले आहेत; परंतु, इस्रायलचे म्हणणे असे की अल शिफा इस्पितळाच्या खाली बंकर्समध्ये हमासचे केंद्र आहे. या इस्पितळाला जर काही झाले तर ती जगातली सर्वांत वाईट घटना ठरेल. इकडे रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधे नाहीत. शस्त्रक्रियेची साधने नाहीत, इतकेच नव्हे वर वीजही नाही. अगदी गरजेच्या शस्त्रक्रिया बॅटरीच्या प्रकाशात कराव्या लागत आहेत. वेदनाशामके आणि ॲन्टिबायोटिक्स औषधे संपली असून, तेथे मदतही पोहोचत नाही. तुर्कस्थानच्या बाजूने एक सीमा उघडून दिली गेली; परंतु, मदत इतकी सुस्त आहे की लोकांपर्यंत पोहोचत नाही.
अन्नासाठी व्याकूळ लोकांनी संयुक्त राष्ट्रांचे एक भंडार लुटले. त्यांनी करावे तरी काय? इस्रायलने लोकांना उत्तरेकडील शाझा प्रदेश सोडून दक्षिणेकडे जाण्याचे फर्मान सोडले. हे करणे काय सोपे आहे? त्यांनी कुठे जावे? कुठे राहावे? आश्रय घेतलेल्या घरांवरही बॉम्ब पडत आहेत. बॉम्बवर्षाव चालू असताना इस्रायल आता जमिनीवरून हल्ले करत आहे. हमास आणि इस्रायल यांच्यातील ही लढाई आता खूपच दीर्घकाळ चालेल हे नक्की. गाझा पट्टी दुसरे मोसूल होईल. इराकचे मोसूल शहर इस्लामिक राजवटीतून खाली करण्यासाठी कुर्द आणि अमेरिकी संयुक्त सेनेला नऊ महिने लागले होते. हजारोंच्या संख्येने तेथे निरपराध नागरिक मारले गेले.
ओलीस ठेवलेले आमचे लोक सोडले जात नाहीत तोवर हल्ले चालूच राहतील, असे इस्रायलने म्हटले आहे. इकडे अमेरिकेने इस्रायलसाठी नवीन आर्थिक मदत मंजूर केली. ही मदत दिवाळीची मिठाई वाटण्यासाठी नक्कीच नाही. गाझा पट्टीत जमिनीखाली बोगद्यात लपलेल्या हमासच्या लोकांना मारण्यासाठी वायूचा वापर केला जाईल, अशी शंका मला आहे. तसे झाल्यास सामान्य नागरिकही बळी पडतील हे उघडच आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने मानवतेच्या आधारावर युद्धबंदीचा एक प्रस्ताव मंजूर जरूर केला आहे; परंतु, दुर्दैवाची गोष्ट अशी की तो बंधनकारक नाही. पॅलेस्टाईनचे पक्के समर्थक असलेले मध्यपूर्वेतील देशही गाझा पट्टीसाठी आपले दरवाजे उघडू इच्छित नाहीत. हमासचे नेते कतारमध्ये बसलेले असून, त्यांच्याकडे भरपूर बॉम्ब आहेत. मारले जात आहेत ते पॅलेस्टिनी. निरपराधांचा संहार थांबवणारे तूर्त तरी कोणी नाही. हा संहार लवकर थांबावा, अशी प्रार्थना करूया.