शाळा पुन्हा सुरू होताना...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 11:52 AM2022-01-23T11:52:06+5:302022-01-23T11:52:38+5:30
बंद झालेल्या शाळा पालक, कार्यकर्ते यांच्या रेट्यामुळे शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र त्या बंद होणार नाहीत, याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. ऑनलाइन शिक्षण हा काही कायमचा पर्याय नाही.
डॉ. दीपक सावंत, माजी आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य
पालक, शिक्षण हक्क कार्यकर्ते यांच्या रेट्यामुळे अखेर शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. राज्य शासनाने ओमायक्रॉनचा संसर्ग मुलांमध्ये वाढू नये म्हणून सुरू झालेल्या शाळा बंद केल्या होत्या. या सर्व व्यवहार चालू बंदच्या घडामोडी आपल्याकडेच नव्हे तर जगात सर्वत्र घडत आहेत. अमेरिका, ब्रिटनमधील किंडर गार्टन शाळा मोठ्या प्रमाणावर मधल्या काळात बंद पडल्या १५ वर्षांवरील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात व्हॅक्सिनेशन व्हावे म्हणूनही या दोन्ही देशांमध्ये प्रयत्न झाले. इतकेच नव्हे तर ५ वर्षांवरील मुलांना व्हॅक्सिन देण्यासाठी चर्चा सुरू झाली.
आता महाराष्ट्रातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांसाठी १० जानेवारीपासून लसीकरण माेहिमेला सुरूवात झाली. सुरूवातीला अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर पुन्हा एकदा लसीकरण थंड झाले. त्यामुळे मात्र शहरी भागातील इंग्रजी माध्यमांच्या शाळा आता सुरू व्हाव्यात अशा प्रकारची भूमिका या शाळांच्या संघटनांनी घेतली आहे. मेस्टा ही संघटना त्यासाठी आग्रही आहे. खरा विचार केला तर या सर्व शाळा सुरू करण्यामागे राज्य शासनाने ठाम भूमिका घेऊन निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. ऑनलाइन शिक्षण हा तात्पुरता पयार्य होऊ शकतो, पण कायमस्वरूपी हा पर्याय आपण स्वीकारू शकत नाही.
विद्यार्थी पालक या दोघांचीही यात अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीसारखी स्थिती झाली आहे. कारण विद्यार्थ्यांला शाळेत पाठवायचे तर तो विद्यार्थी स्वत:ची काळजी घेऊ शकेल का? त्याला संसर्ग झाला तर त्याच्या आजारपणाचे काय करायचे, मध्यमवर्गीय व कनिष्ठ मध्यम वर्गासाठी यासाठी आर्थिक पेच निर्माण होताना दिसत आहे. कारण सर्वच ठिकाणी सार्वजनिक रूग्णालयात यासाठी विशेष वॅार्ड नाही. छोटी मुलं एकटे विलगीकरणात कसे राहणार मग रुग्णालयात विलगीकरण असो की गृह विलगीकरण. कारण ते घरात इतरांमध्ये मिसळणार, आणि रुग्णालयामध्ये आई- वडील यामध्ये एकाला तरी राहावे लागणार. मग शेवटी पुन्हा नोकरीचा प्रश्न आला, संसर्गाचा प्रश्न आला. त्यामुळे उच्च मध्यमवर्गीय पालक किंवा इंग्रजी माध्यमाच्या उत्तम शाळेत मुलाला पाठवणारे पालक शाळा सुरू होण्याच्या प्रक्रियेतून स्वत:ला दूरच ठेवतात.
अगदी पालक सभेतही ते ही गोष्ट प्रकर्षाने पुढे आणून शाळा सुरू करण्यासाठी विरोध करताना दिसतात. मराठी माध्यमाच्या शाळा, महानगर पालिकेच्या शाळा या कोविडकाळात सुरू करणे म्हणजे खासगी संस्था चालकांच्या समोर आर्थिक प्रश्न उभा राहतो. अनेक शाळांच्या पालकांना फी देता आली नाही किंवा शाळांना शासनाने मनाई केली. त्यामुळे साेशल डिस्टन्सिंगने वर्ग भरविणे कोविडसाठी आवश्यक असलेले निर्बंध पाळणे हे या संस्थांना बहुतेकदा झेपत नाही. शिक्षक ऑनलाइन वर्ग घेणेच जास्त पसंत करतात. ऑनलाइन शिक्षण म्हणजे आनंदी आनंद आहे. सुरूवातीच्या काळात ऑनलाइन शिक्षण पद्धती म्हणजे एक अपूर्वाई होती. पण पुढे पुढे त्याचे फायदे- तोटे कळत गेले. फायद्यापेक्षा तोटेच जास्त दिसले.
नर्सरी ते चैाथी पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या दोन वर्षांत काय ज्ञान प्राप्त झाले, याचा शोध घेणे आवश्यक आहे. ऑनलाइन शिक्षण घेताना विद्यार्थी एका वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अनुभव यामुळे दिसून येत आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतलेले निर्णय दोन ते तीन वेळा गेल्या वर्षभरात फिरवावे लागले. त्यामुळे याबाबत लोकांच्या मनात नेहमीच साशंकता दिसून येते, याला कारण कोविडची दुसरी लाट आणि मग तिसऱ्या लाटेत म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये थोडा शांत झालेला कोविड पुन्हा उसळी मारून ओमायक्रॉनच्या रूपाने पुन्हा उसळून आला.
पण मॅाल, सिनेमाहॅाल, लग्नसमारंभात मुले दिसत होती. मुलांच्या शिक्षणाचे काय? परिक्षांचे काय? ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थी किती प्रामाणिकपणे परीक्षा देतो. त्याला आईवडील मदत करतात का? हे सर्व प्रश्न आहेतच. म्हणून कोविडची दहशत झुगारून व्हॅक्सिनेशनची ढाल घेऊन मैदानात उतरणे आवश्यक आहे. कदाचित आपल्याला भविष्य काळासाठी लहान मुलांच्या व्हॅक्सिनेशन शेड्युलमध्ये पोलिओ, इन्फ्ल्युएन्झा, पेंन्टावलेंट व्हॅक्सिनसारखा कोविड व्हॅक्सिन अंतर्भूत करावे लागणार का? याचा तज्ज्ञांच्या पातळीवर विचार होणे गरजेचे आहे. योग्य व्हॅक्सिन, योग्य बूस्टर डोस याचे प्रमाण ठरविणे गरजेचे आहे. कारण भीतीपोटी मुलांना शाळेत न पाठवून अभ्यास घेणे, ऑनलाइन परीक्षा घेणे हे संयुक्तिक नाही. कोविडमध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलांना आपल्याकडे उत्तम ज्ञान आहे. हे जगाला आणि जगातील सर्वच मुलांना सांगता आले पाहिजे, म्हणूनच आपण म्हणत आहोत.
Stay with covid, Live with covid But Education should be on शिक्षण हे दिले गेलेच पाहिजे. माध्यम काहीही असो कदाचित २०२० जूनमध्ये पहिल्यांदा शाळेत पाऊल ठेवणाऱ्या बालकाने अजून शाळेचा वर्गच पाहिला नाही. त्याची उत्सुकता आणि जिज्ञासा संपण्यापूर्वी आता पुन्हा शाळा उघडू या! त्या पुन्हा बंद होणार नाहीत. योग्य ती काळजी घेऊन वर्ग सुरू राहतील, याची काळजी घेऊ या!