इंजिनीअरिंग, फार्मसीच्या प्रवेश परीक्षा १६ मार्चपासून; सीईटी सेलकडून संभाव्य वेळापत्रक जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 06:17 AM2024-11-28T06:17:11+5:302024-11-28T06:17:42+5:30

विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षांचे वेळापत्रक माहीत झाल्यास त्यानुसार या परीक्षांची तयारी करणे शक्य व्हावे यादृष्टीने तीन महिन्यांपूर्वीच प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले आहे.

Engineering, Pharmacy Entrance Exam from 16th March; Probable schedule released by CET Cell | इंजिनीअरिंग, फार्मसीच्या प्रवेश परीक्षा १६ मार्चपासून; सीईटी सेलकडून संभाव्य वेळापत्रक जारी

इंजिनीअरिंग, फार्मसीच्या प्रवेश परीक्षा १६ मार्चपासून; सीईटी सेलकडून संभाव्य वेळापत्रक जारी

मुंबई - राज्य सामायिक परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) आगामी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी सामायिक प्रवेश परीक्षांचे (सीईटी परीक्षा) संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून, विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांना १६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी आणि कृषी शाखेची सीईटी परीक्षा ९ एप्रिल ते २७ एप्रिलदरम्यान घेण्याचे सीईटी सेलने प्रस्तावित केले आहे.  

राज्यातील पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलकडून दरवर्षी घेतली जाते. विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षांचे वेळापत्रक माहीत झाल्यास त्यानुसार या परीक्षांची तयारी करणे शक्य व्हावे यादृष्टीने तीन महिन्यांपूर्वीच प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले आहे. सीईटी सेलने १९ परीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. त्यानुसार यंदा सीईटी सेलकडून एमएड आणि एमपीएड अभ्यासक्रमांची परीक्षा १६ मार्चला घेतली जाणार आहे. सीईटी सेलकडून पीसीबी ग्रुपची एमएचटी सीईटी परीक्षा ९ एप्रिल ते १७ एप्रिलदरम्यान आणि पीसीएम ग्रुपची परीक्षा १९ एप्रिल ते २७ एप्रिलदरम्यान घेतली जाणार आहे, तर एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा १७ मार्च ते १९ मार्च दरम्यान घेण्याचे प्रस्तावित केले आहे.  
सीईटी सेलने तीन वर्षांच्या विधि अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा २१ मार्च आणि २१ मार्च या कालावधीत, तर पाच वर्षांच्या विधि अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा ४ एप्रिलला घेण्यात येणार असल्याचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नोलॉजीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी बीएचएमसीटी २८ मार्च, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची एमएचएमसीटी २७ मार्चला घेण्याचे प्रस्तावित केले आहे.

Web Title: Engineering, Pharmacy Entrance Exam from 16th March; Probable schedule released by CET Cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा