संदीप आडनाईककोल्हापूर : पश्चिम घाटातील सर्वांत समृद्ध भाग म्हणून ओळख असल्यामुळे कोल्हापुरात येणाऱ्या परदेशी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या नैसर्गिक अधिवासांना धोका पोहोचत असल्यामुळे घटत चालली आहे. दरवर्षी ऑक्टोबरअखेरीस येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांनी यंदाही पाठ फिरवली आहे. ही लक्षणे म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने धोक्याची घंटा असल्याचे पक्षीप्रेमींचे मत आहे.पक्षीनिरीक्षक हिमांशू स्मार्त, सतपाल गंगलमाले यांच्या चमूने गेल्या चार दिवसांत कळंबा आणि रंकाळा परिसरात आलेल्या पक्ष्यांच्या नोंदी केल्या आहेत. त्यांना अनेक स्थलांतरित पक्षी यंदा आढळलेले नाहीत. २०१४ पासून हे पक्षीप्रेमी रंकाळ्यावरच्या नोंदी घेत आहेत. २०१९ पर्यंत सुमारे ३६ पक्ष्यांची नोंद त्यांच्याकडे आहे, परंतु यावेळी केवळ ११ प्रजातींचीच नोंद झालेली आहे.कोल्हापुरात येणाऱ्या पक्ष्यांमध्ये बहुसंख्येने युरोपियन, सैबेरियन पक्षी आहेत. याशिवाय पठारावर आढळणारे शिकारी पक्ष्यांचीही नोंद झालेली आहे, परंतु आता ही संख्याही कमी झाली आहे. मॉन्टीगिव्ह हारिण हा शिकारी पक्षी सध्या दिसतो, पण अजून काही पक्षी आढळलेले नाहीत.या ठिकाणी आहे पक्ष्यांचा अधिवास :कळंबा, रंकाळा, पन्हाळा, आंबा, राधानगरी, गगनबावडा, चांदोली, तिलारी, आंबोली या ठिकाणी स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास आहे.कोल्हापुरात नोंदवलेले स्थलांतरित पक्षीपाणपक्षी : पिवळा धोबी, पांढरा धोबी, करडा धोबी, भुवई बदक, साधी तुतारी, कैकर, युरेशियन दलदल हारिण.झुडूपवर्गीय पक्षी : वेळूतला दंगेखोर वटवट्या, ब्लिथचा वेळूतला वटवट्या, काळ्या डोक्याचा कहुआ, सायबेरियन स्टोन चॅट, सुलोही.ही आहेत कारणे...पाणवठ्याच्या आणि दलदलीच्या कमी झालेल्या जागा, पाण्यातील वाढते प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड, रस्ते विकास प्रकल्प यामुळे या पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. मोठमोठी विकासकामे, मानवी हस्तक्षेप होऊ लागल्याने पक्ष्यांना ही ठिकाणे सुरक्षित वाटत नाहीत. शहरातील तळ्यांवर मानवी वावर वाढला आहे. रंकाळा, कळंबा येथे फिरायला येणाऱ्यांची संख्याही वाढलेली आहे.
रंकाळा आणि कळंबा या दोन तलावांमुळे जैवविविधता टिकून आहे. कोल्हापुरात येणारे बहुतेक पक्षी हे झाडांवर आढळणारे आणि पाण्यात विहरणारे आहेत, पण यंदा पावसाळा अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे दलदलीच्या जागा आढळत नाहीत, त्यामुळे नियमित येणारे काही पक्षी आढळत नाहीत.- हिमांशू स्मार्त, पक्षीनिरीक्षक.