राजाराम तलावावर संकटग्रस्त नदी सुरय पक्ष्याची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 10:27 AM2021-01-12T10:27:59+5:302021-01-12T10:29:43+5:30
Birds Of kolhapur- इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरने (आययुसीएन) संकटग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या नदी सुरय (रिव्हर टर्न)सारख्या पक्ष्यांसोबत १४ स्थलांतरित पक्ष्यांची नोंद 'बर्डस् ऑफ कोल्हापूर' या ग्रुपने राजाराम तलावावर रविवारी केलेल्या पक्षी गणनेत नोंदविली गेली आहे. एकूण ६७ प्रजातींच्या ८३६ पक्ष्यांची नोंद या तलावावर झाली आहे. राजाराम तलावावरही स्थलांतरित बदकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले
संदीप आडनाईक
कोल्हापूर : इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचरने (आययुसीएन) संकटग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या नदी सुरय (रिव्हर टर्न)सारख्या पक्ष्यांसोबत १४ स्थलांतरित पक्ष्यांची नोंद 'बर्डस् ऑफ कोल्हापूर' या ग्रुपने राजाराम तलावावर रविवारी केलेल्या पक्षी गणनेत नोंदविली गेली आहे. एकूण ६७ प्रजातींच्या ८३६ पक्ष्यांची नोंद या तलावावर झाली आहे. राजाराम तलावावरही स्थलांतरित बदकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.
'बर्डस् ऑफ कोल्हापूर' या ग्रुपमार्फत कोल्हापूर शहर आणि परिसरातील वेगवेगळ्या भागात पक्षी गणना करण्यास प्रारंभ झाला आहे. रविवारी राजाराम तलावावर पक्षी गणनेचा दुसरा भाग पूर्ण झाला. पुढील रविवारी, दि. १७ रोजी सकाळी ६.४५ पासून शिवाजी विद्यापीठ परिसरात पक्षी गणना करण्यात येणार आहे.
राजाराम तलावावर कॉमन सॅन्डपायपर (सामान्य तुतारी), ग्रीन सॅन्डपायपर (हिरवी तुतारी), वूड सॅन्डपायपर (ठिपकेवाली तुतारी), कॉमन ग्रीनशांक (सामान्य हिरवा टीलवा), क्लॅमरस रीड वोब्लर (दंगेखोर बोरू वटवट्या), ब्लिथस् रीड वोब्लर (ब्लिथचा बोरू वटवट्या), पॅडीफील्ड वोब्लर (धान वटवट्या), बुटेड वोब्लर (पायमोज वटवट्या), रोजि स्टारलिंग (गुलाबी मैना), टायगा फ्लायकेचर (लाल कंठाची माशीमार), ब्राउन श्राइक (तपकिरी खाटिक), ब्लिथस् पीपीट (ब्लिथची तिरचिमणी), येल्लोव वॅगटेल (पिवळा धोबी), व्हाईट वॅगटेल (पांढरा धोबी) हे १४ स्थलांतरित पक्षी आढळले, मात्र राजाराम तलावावरही स्थलांतरित बदकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.
या कोल्हापूर पक्षी गणनेस ज्येष्ठ पक्षीमित्र दिलीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. या मोहिमेचे आयोजन प्रणव देसाई आणि सत्पाल गंगलमाले यांनी केले आहे. या पक्षी गणनेमध्ये अभिषेक शिर्के, ऋतुजा पाटील, स्वप्नील असोडे, पृथ्वीराज सरनोबत यांच्यासह कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील, पक्षी निरीक्षकांनी सहभाग नोंदवला.
गतवर्षी आढळले होते ४५४ पक्षी
मागील वर्षीच्या पक्षी गणनेमध्ये ६३ प्रजातींचे ४५४ पक्षी नोंदवले गेले होते. या पक्षी गणनेतून जमा झालेली माहिती 'वेटलाँड इंटरनॅशनल' या पर्यावरणीय संघटनेच्या 'इंटरनॅशनल वॉटरबर्ड सेन्सस'मध्ये नोंद करण्यात येत आहे.