Fact Check : मोईन अलीची धमकी?; Nupur Sharma प्रकणावरून भारताने माफी मागावी अन्यथा IPLवर बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 03:06 PM2022-06-13T15:06:45+5:302022-06-13T15:08:21+5:30
Nupur Sharma News: भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैंगंबरांवरील विधानावरून देशातील वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय.
Nupur Sharma News: भाजपाच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैंगंबरांवरील विधानावरून देशातील वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. शुक्रवारी नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशभरात मुस्लिम बांधवांनी तीव्र आंदोलन केले होते. शनिवारी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ अहमदाबादमधील सरखेज गांधीनगर महामार्गावर शेकडो लोकं जमा झाले. नुपूर शर्मा यांना काहींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली ( Moeen Ali) याच्या नावाने एक ट्विट व्हायरल झालं आहे. त्यात त्याने या प्रकरणी भारताने माफी मागावी अन्यथा इंडियन प्रीमिअर लीगवर बहिष्कार घालणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवाय भारतात क्रिकेट खेळण्यास येणार नसल्याचेही त्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैंगंबरांवरील विधानावरून 16 देशांनी भारत सरकारवर टीका केली आहे. त्यात इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूच्या नावाने व्हायरल झालेल्या ट्विटने क्रिकेट वर्तुळात खळबळ उडवली आहे. पण, हे ट्विटर अकाऊंट मोईन अलीचे नाही आणि ते आता सस्पेंड केले गेले आहे. याचा अर्थ ते अकाऊंट अधिकृत नाही.
'@Moeen_Ali18' या ट्विटर हँडलवरून हे ट्विट व्हायरल झाले. त्यात लिहिले गेले की,''नुपूर शर्माच्या विधानाप्रकरणी भारताने माफी न मागितल्यास. मी भारतात क्रिकेट खेळायला येणार नाही, तसंच मी आयपीएल स्पर्धेवर बहिष्कार टाकेन. मी माझ्या मुस्लिम बांधवांनाही असंच करण्याचं आवाहन करत आहे.''
'@Moeen_Ali18' हे अकाऊंट सस्पेंड करण्यात आल्याचे आमच्या तपासात समोर आले. मे 2022 मध्ये हे अकाऊंट तयार करण्यात आले आणि 8000 अधिक फॉलोअर्स त्याला होते. अकाऊंटच्या बायोमध्ये नॉट ऑफिशियल असे लिहिले गेले हे.