Fact Check: 'सम्राट पृथ्वीराज'चं भाजपा कार्यालयातून 'प्रमोशन'?; जाणून घ्या, अक्षय कुमार-अमित शाहांच्या फोटोमागचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 01:20 PM2022-06-07T13:20:57+5:302022-06-07T13:26:04+5:30
'सम्राट पृथ्वीराज' सिनेमाचं भाजपाच्या कार्यालयातून प्रमोशन करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. पण याची पडताणी केली असता संबंधित दावा पूर्णपणे खोटा असल्याचं निष्पन्न झालं आहे.
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांकडून सिनेमाला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. पण अक्षय कुमार आणि त्याच्याशी निगडीत खोट्या पोस्ट हे जणू समीकरणंच सोशल मीडियात तयार झालं आहे. 'खिलाडी' कुमारशी निगडीत अनेक खोटे दावे सोशल मीडियात व्हायरल होत असतात असाच एक दावा आता 'सम्राट पृथ्वीराज'च्या निमित्तानं करण्यात आला आहे. 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमाचं भाजपाच्या कार्यालयातून प्रमोशन करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. पण याची पडताणी केली असता संबंधित दावा पूर्णपणे खोटा असल्याचं निष्पन्न झालं आहे.
दावा काय?
फेसबुकवर संजय सिंह परिहार नामक व्यक्तीनं अभिनेता अक्षय कुमार, देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमातील अभिनेत्री मानुषी छिल्लर यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमाचं प्रमोशन भाजपाच्या कार्यालयातून करण्यात येत असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. तसंच अक्षय कुमारनं अमित शाहांच्या हस्ते भारताचं नागरिकत्व स्वीकारल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. पोस्ट करण्यात आलेल्या फोटोत अक्षय कुमार आणि अमित शाह भेट घेत असल्याचं दिसून येतं. तसंच मागच्या बाजूस 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमाचं पोस्टर देखील दिसून येत आहे.
कशी केली पडताळणी?
दावा करण्यात आलेला फोटो सेव्ह करुन गुगल रिव्हर्स इमेजच्या माध्यमातून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर गुगलमध्ये या फोटो संबंधी अनेक लिंक्स पाहायला मिळाल्या. यात सम्राट पृथ्वीराज सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला अमित शाह यांनी उपस्थिती लावल्याचा उल्लेख बहुतांश बातम्यांमध्ये आढळला. अमित शाह यांच्यासाठी दिल्लीत सम्राट पृथ्वीराज सिनेमाचं एका थिएटरमध्ये खास स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं अशी माहिती देशातील बहुतांश प्रमुख माध्यमांनी दिली आहे. याशिवाय व्हायरल पोस्टमध्ये वापरण्यात आलेला फोटो अभिनेत्री मानुषी छिल्लर हिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही आढळून आला.
अभिनेत्री मानुषी छिल्लर हिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर १ जून २०२२ रोजी हा फोटो पोस्ट केला आहे. "भारताचे माननीय गृहमंत्री श्री अमित शाह जी आणि इतर सर्व महत्वाच्या व्यक्तींनी आज नवी दिल्ली येथे 'सम्राट पृथ्वीराज'च्या विशेष स्क्रीनिंगला उपस्थिती लावली", असं कॅप्शन मानुषीनं पोस्टला दिलं आहे. त्यामुळे संबंधित फोटो भाजपाच्या कार्यालयातील नसल्याचं लक्षात येतं.
निष्कर्ष
गृहमंत्री अमित शाह आणि अक्षय कुमार यांच्या भेटीचा फोटो भाजपाच्या कार्यालयातील नसून दिल्लीतील एका थिएटरमध्ये 'सम्राट पृथ्वीराज'च्या विशेष स्क्रिनिंगमधील आहे.