नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून कोरोनाग्रस्तांची संख्या एक कोटीच्या वर गेली आहे. तर आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. सर्वप्रथम देशातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आलं. यामध्ये आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यंत्रणा तसेच सैन्यदलासह सफाई कामगारांचाही समावेश आहे. यानंतर आता लसीकरणाचा दुसरा टप्पा येत्या 1 मार्चपासून सुरू होणार आहे.
सोशल मीडियावर लसीकरणाबाबत अनेक मेसेज हे सातत्याने व्हायरल होत आहे. कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्याबाबत Whatsapp वर एक मेसेज जोरदार व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात लसीसाठी 500 रुपये मोजावे लागतील असं म्हटलं आहे. तसेच 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना आपल्यासोबत वोटर आयडी, पॅनकार्ड आणावं लागले असं देखील म्हटलं आहे. मात्र आता पीआयबीनेहा दावा फेटाळून लावला आहे. हे पूर्णपणे खोटं असल्याचं म्हटलं आहे. पीआयबीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.
आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सनंतर आता 1 मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांचंही कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि 45 पेक्षा जास्त वयाच्या ज्यांना इतर आजार आहेत, अशा व्यक्तींचा या लसीकरणात समावेश आहे. सरकारी आणि खासगी केंद्रांवर ही लस दिली जाईल. यासाठी 10,000 सरकारी आणि 20,000 खासगी केंद्रे आहेत. सरकारी केंद्रांवर मोफत तर खासगी केंद्रावर शुल्क घेऊन लस दिली जाईल. कोरोना लसीसाठी नोंदणी करणं गरजेचं आहे. एक मार्चपासून ऑनलाईन नोंदणी करू शकता. Co-Win App 1 मार्चपासून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल. तोपर्यंत ऑफलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
1 मार्चपासून सर्वसामान्यांना मिळणार Corona Vaccine; जाणून घ्या, लसीकरणासाठी कसं करायचं रजिस्ट्रेशन?
को-विन (Co-Win), आरोग्य सेतू (Aarogya Setu) अॅप या मोबाईल अॅपच्या माध्यमातून किंवा cowin.gov.in या संकेतस्थळावरून तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. लस घेऊ इच्छिणाऱ्यांना प्रथम ‘को-विन’ अॅप आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करून नावाची नोंदणी करावी लागेल. ऑनलाइन नोंदणी करताना सर्वात आधी तुमचा मोबाइल क्रमांक टाका. यानंतर तुम्हाला अकाऊंट तयार करण्यासाठी ओटीपी मिळेल. यानंतर तुमचं नाव, वय, लिंग आणि आवश्यक ओळखपत्रं अपलोड करा. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक नसाल पण तुमचं वय 45 पेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला इतर आजार असेल तर तुम्हाला असलेल्या आजाराचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्यानंतर ही सुविधा मिळू शकेल. तुम्हाला मोबाईल अॅप किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं शक्य नसेल तर तुम्ही जवळच्या सेवा केंद्रांवर जाऊन तिथं आपली नोंदणी करू शकता. खासगी केंद्रे व रुग्णालयांत या लसीसाठी ठरावीक शुल्क आकारले जाईल.