जपानमध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सुरू होण्यास अवघे तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. कोरोनाच्या संकटावर मात करुन अखेर ऑलिम्पिक स्पर्धा यशस्वीरित्या घेण्याचा आयोजकांचा मानस आहे. पण सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच गोष्टीची जोरदार चर्चा आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना राहण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या खोल्यांमध्ये 'अँटी-सेक्स' बेड्स देण्यात आल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियात सुरू आहे. (The Truth About 'Anti-Sex' Beds At The Olympics)
क्रीडाग्राममध्ये खेळाडूंना कार्डबोर्डपासून तयार करण्यात आलेले बेड्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. एका बेडवर एकच जण झोपू शकेल आणि त्याची वजन पेलण्याची क्षमता फार कमी ठेवण्यात आल्याची माहिती सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. कोरोनाचं संकट आणि स्पर्धा लक्षात घेता खेळाडूंमध्ये जवळीक निर्माण होऊ नये, त्यांना 'सेक्स'पासून दूर ठेवता यावं यासाठीच अशा पद्धतीचे अँटी-सेक्स बेड्स तयार करण्यात आल्याची अफवा सोशल मीडियात पसरली आहे.
टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजकांनी या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं असून एका खेळाडूनं कार्डबोर्ड बेड्सच्या क्षमतेची माहिती देणारा एक व्हिडिओच ट्विट केला आहे. या व्हिडिओतून सोशल मीडियात चर्चा होत असलेल्या 'अँटी-सेक्स' बेड्सच्या चर्चेला सडेतोड उत्तर मिळालं आहे.
रायल मॅक्लेघन या खेळाडूनं क्रीडाग्राममध्ये त्याला उपलब्ध करुन देण्यात आलेल्या खोलीतून एक व्हिडिओ शूट केला आहे. यात त्यानं कथित 'अँटी-सेक्स' कार्डबोर्ड बेडवर अगदी उड्या मारुन त्याची उच्चप्रतिची क्षमता आणि गुणवत्ता दाखवून दिली आहे. यामाध्यमातून मॅक्लेघन यानं सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या अँटी-सेक्स बेड्सच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे, ऑलिम्पिक्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुनही मॅक्लेघनचं ट्विट रिट्विट करण्यात आलं आहे.
सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या अफवा खोट्या ठरवल्याबद्दल ऑलिम्पिक्सच्या ट्विटर हँडलवरुन मॅक्लेघन याचे आभार व्यक्त करण्यात आले आहे. पुठ्ठ्यापासून तयार करण्यात आलेले बेड्स किती मजबूत आहेत हे या व्हिडिओतून स्पष्ट होतं, असंही नमूद करण्यात आलं आहे.