मुंबई : बॉलिवूड चित्रपटातील भरजरी कपडे पाहून तुमचेही डोळे फिरत असतील ना. प्रत्येक चित्रपटांमधून एक वेगवेगळी फॅशन बाहेर येत असते. घूमरच्या गाण्यातील दिपीका पदुकोणचा लेहेंगाही आता फार प्रसिद्ध झालाय. अशा बिग बजेट चित्रपटातील हे उंची कपडे पुन्हा कोण वापरत असतील असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल. कारण हे कपडे पुन्हा कोणत्याच चित्रपटात किंवा कोणतीच अभिनेत्री पुन्हा परिधान करताना दिसत नाही. मग हे एवढ्या महागातले डिझायनर्स कपड्याचं होतं तरी काय? याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
चित्रपटांत कलाकरांनी घातलेले कपडे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याची फॅशन बनते. कलाकारांचे चाहते त्या चित्रपटातील फॅशनचं अनुकरण करतात. दुसरा चित्रपट आला की त्या चित्रपटातील फॅशन बाजारात इन होते. पण कलाकारांचे हे कपडे चित्रपट संपला की कुठे जात असेल? राज फिल्म्सच्या डिझायनर्स आएशा खन्ना यांनी ह्युमन बिंग या संकेतस्थळाने घेतलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, हे कपडे एकदा का कलाकारांनी वापरून झाले की ते प्रोडक्शन हाऊसच्या गोदाममध्ये पडून राहतात.
या कपड्यांवर ज्या नायिकेने कपडे परिधान केले होते त्यांच्या नावाचं लेबल लावलं जातं. तसंच, मुख्य नायिका, सहाय्यक नायिका असंही लेबल त्यावर लावलं जातं. नंतर हेच कपडे प्रोडक्शन हाऊसच्या पुढच्या प्रकल्पात म्हणजेच पुढच्या चित्रपटात वापरली जातात. अर्थात या कपड्यांची थोडी फार डिझाइन्स बदलली जातात. जेणेकरून प्रेक्षकांना हे कपडे आधीच्या चित्रपटात वापरले आहेत याची कल्पनाही येत नाही.
तुम्हाला ऐश्वर्या रायचा ‘कजरारे’ हे गाणं आठवतंय? या गाण्यावेळी तिने जे कॉस्च्यूम परिधान केले होते, तेच कपडे 2010 साली प्रदर्शित झालेला बँड बाजा बारात या चित्रपटातील एका गाण्यातील बॅकग्राऊंड नृत्यांगणाने परिधान केले होते, पण हे कोणाच्याच लक्षात आलं नाही.
एखाद्या चित्रपटातील कपडे जर अभिनेत्रीला आवडली तर ते कोणालाही न विचारता सरळ घेऊनही जातात. बरं याचाही खर्च चित्रपटाच्या बजेटमधूनच केला जातो. कधी-कधी या कपड्यांचा लिलाव केला जातो आणि लिलावातून येणारे पैसे सामाजिक संस्थाना दिले जातात.
‘जिने के है चार दिन’ या गाण्यात सलमान खानने जो टॉवेल वापरला होता, त्या टॉवेलचा लिलाव केल्यावर लाखो रुपये मिळाले होते.
त्यानंतर लगानमध्ये आमिर खानने जी बॅट वापरली होती, ती बॅटही लाखो रुपयात विकली गेली होती. हे सगळे पैसे सामाजिक संस्थाना दिले जातात असं सांगण्यात येतं.
कपड्यांचा सार्वाजानिक लिलाव झाला पाहिजे अशी संकल्पना फार पूर्वीपासून आहे. त्यामुळे ही संकल्पना लवकरच प्रत्येक प्रोडक्शन हाऊसने प्रत्यक्षात आणली पाहिजे अशी अपेक्षा सगळ्याच डिझायनर्सकडून केली जातेय.