Join us  

"राज ठाकरेंची भूमिका प्रेरणादायी अन् रोखठोक..."; अभिनेता सयाजी शिंदेंनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 9:25 AM

मनसेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात राज ठाकरेंनी देशातील वृक्षतोडीवर भूमिका मांडली. त्याचं अभिनेता सयाजी शिंदेंनी कौतुक केले.  

मुंबई - राज ठाकरेंची वक्तव्यं नेहमीच प्रेरणादायी अन् रोखठोक, सरळ असतात. वृक्षतोडीवर त्यांनी जे विधान केले ते निसर्गासाठी, पर्यावरणासाठी फारच चांगले आहे. या भूमिकेचं धोरणात्मक पातळीवर सरकारनं अंमल केला पाहिजे. विद्युत शवदाहिनी जास्तीत जास्त वापरात आल्या पाहिजेत, लोकांना त्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे असं सांगत अभिनेता सयाजी शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत केले आहे.

अभिनेता सयाजी शिंदे म्हणाले की, मी गोरेगावच्या हिंदू स्मशानभूमीत गेलो होतो, त्याचा अभ्यास केला. त्याठिकाणी दर महिन्याला ३०० मृतदेह येतात. एकाला ७ मण लाकडं लागतात. म्हणजे महिन्याला किलो लाकडं लागत असतील. त्यामुळे विद्यृत शवदाहिनी वापरल्या पाहिजे. लाकडाला पर्याय म्हणून आमच्या सातारकडे शेणकुटं गोळा करतात. त्यापासून मृतदेह जाळतात. हे एका दोघाचं काम नाही. धोरणात्मक योजना तयार केली पाहिजे. राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका अतिशय स्वागतार्ह आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच प्रथा, परंपरेबाबत बोललं पाहिजे, परंतु हल्ला सोशल मीडियात काही बोलले तर लोक त्याच्याविरोधात बोलतात. होळीला जास्त लाकडं कशाला जाळता, एका लाकडाची होळी करायची, जास्त आनंद घ्यायचा असं मी बोललो होतो. मग तुम्ही हिंदूंच्या सणांवर बोलता, वैगेरे बोललं जाते. जंगलाचं अनेकदा नुकसान होतं. राज ठाकरेंनी भूमिका मांडली ते चांगले आहे. सरकारने याबाबत धोरण बनवायला हवं असंही सयाजी शिंदे यांनी सांगितले. 

दरम्यान, राज ठाकरेंच्या भूमिकेवर चर्चा करून जर हे प्रत्यक्षात अंमलात आणायचं ठरवलं तर मी पुढाकार घेईल, मला खूप आवडेल. वैयक्तिक पातळीवर मी त्यांच्याशी बोलेन. मी राज ठाकरेंना भेटेन, देवेंद्र फडणवीस यांना भेटायचं आहे. मंदिराच्या ज्या जागा पडिक आहेत, ज्यावर अतिक्रमण होतायेत तिथे आपण झाडं लावू शकतो, त्याशिवाय मंदिरात अभिषेकानंतर प्रसाद म्हणून एक झाड द्यावं, जेणेकरून श्रद्धेने ही झाडं लावली जातील अशी मागणीही अभिनेता सयाजी शिंदे यांनी केली. 

टॅग्स :राज ठाकरेसयाजी शिंदेमनसे