दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींना पाकिस्तानातून धमकी आल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलंय. मिथुन चक्रवर्तींना पाकिस्तानी गँगस्टरने धमकी दिली आहे. या गँगस्टरने दुबईमधून व्हिडीओच्या माध्यमातून मिथुन चक्रवर्तींना धमकी दिलीय. मिथुन यांनी काही दिवसांपूर्वी भाजपच्या एका जाहीर सभेत दिलेल्या भाषणावर निशाणा साधत या गँगस्टरने मिथुन यांना धमकी दिली आहे.
मिथुन यांना दिलेल्या धमकीत काय म्हटलं गेलं?
पाकिस्तानी गँगस्टरने मिथुन चक्रवर्तींच्या भडकाऊ भाषणावर निशाणा साधत सांगितलंय की, "मिथुन साब मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तुम्ही पुढील १०-१५ दिवसात एखादा व्हिडीओ पोस्ट करुन माफी मागा. तुम्ही माफी मागितली तर चांगलं होईल आणि माफी मागणं तुम्हाला भाग आहे. तुम्ही आमची मनं दुखावली आहेत. तुम्हाला इतर धर्मीय माणसांकडून जितकं प्रेम मिळालंय तितकंच प्रेम आणि इज्जत मुसलमान लोकांनीही दिलीय." शेवटी माफी मागितली नाही तर तुम्हाला पश्चाताप होईल, असंही हा गँगस्टर म्हणाला.
मिथुन चक्रवर्तींच्या भाषणामुळे साधला निशाणा
ऑक्टोबर महिन्याच्या २७ तारखेला मिथुन चक्रवर्तींनी एका राजकीय कार्यक्रमात प्रक्षोभक भाषण केल्याचं बोललं जातंय. त्यानंतर मिथुन यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आला होता. भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यक्रमात मिथुन यांनी हे भाषण दिलं होतं. या भाषणामुळे पाकिस्तानी गँगस्टरने मिथुन यांच्यावर निशाणा साधला असून त्यांना धमकी दिलीय. या धमकीनंतर मिथुन माफी मागणार का? त्यांचं मत काय? याकडे सर्वांचं लक्ष आहे.