Join us

Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 7:00 PM

Salman Khan : गेल्या आठवड्यात ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सॲप नंबरवर धमकी मिळाली होती. मात्र आता धमकी देणाऱ्या व्यक्तीने माफी मागितली आहे.

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानला सतत धमक्या देण्यात येत आहेत. गेल्या आठवड्यात ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सॲप नंबरवर धमकी मिळाली होती. मात्र आता धमकी देणाऱ्या व्यक्तीने माफी मागितली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेसेज करणाऱ्याने हा मेसेज त्याने चुकून पाठवला असल्याचं सांगितलं आणि त्यासाठी त्याला माफी देखील मागायची असल्याचं म्हटलं आहे. 

पोलिसांना हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचं लोकेशन सापडलं असून ते झारखंडमधील एक ठिकाण असल्याचं समोर आलं आहे. या व्यक्तीच्या शोधात पोलिसांचे पथक तेथे पोहोचले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला लॉरेन्स बिश्नोई गँगचा जवळचा असल्याचं सांगितलं आणि दावा केला की तो सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोईमध्ये समेट घडवून आणेल.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर आलेल्या धमकीच्या मेसेजमध्ये अभिनेता सलमान खानकडून लॉरेन्स बिश्नोईशी दीर्घकाळापासून असलेलं वैर संपवण्यासाठी तब्बल ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.

ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर आलेल्या मेसेजमध्ये व्यक्तीने असा दावा केला होता की, "हे हलक्यात घेऊ नका, जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल आणि लॉरेन्स बिश्नोईशी वैर संपवायचं असेल, तर त्याला ५ कोटी रुपये द्यावे लागतील. जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षा वाईट होईल."

हा मेसेज मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी या अनोळखी व्हॉट्सॲप नंबर युजर विरोधातील तक्रार गांभीर्याने घेतली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सलमान खानला ही धमकी त्यावेळी मिळाली होती जेव्हा सलमानचे जवळचे मित्र बाबा सिद्दिकी यांची मुंबईत झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. एबीपी न्यूजने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :सलमान खानबॉलिवूड