रितेश देशमुख ( Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडपं सध्या चर्चेत आहे. त्यांच्या वेड (Ved Marathi Movie) चित्रपटाला रिलीज होऊन महिना उलटला असला तरी या चित्रपटाची क्रेझ अद्याप कमी झालेली दिसत नाही. पहिल्या दिवसापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर ७० कोटींहून जास्त कमाई केली आहे. वेडमधील सत्या आणि श्रावणी म्हणजे रितेश आणि जिनिलिया यांच्या लग्नाचा आज ११वा वाढदिवस असून त्यानिमित्ताने त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्नांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेता रितेश देशमुखने जिनिलियासोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, माझा आनंद, माझी सुरक्षित जागा, माझं जीवन...११व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको.
तर जिनिलिया देशमुखने देखील रितेशसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या दोघांच्या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रेटी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांची लव्हस्टोरी खूप हटके आहे. रितेश आणि जिनिलियाने तुझे मेरी कसम या चित्रपटात एकत्र काम केले आणि तिथूनच त्यांच्या प्रेम कहाणीची सुरुवात झाली होती. मात्र जिनिलियाचे रितेशला भेटल्यावर त्याच्याबद्दलचे मत चांगले नव्हते. तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा होता. त्यामुळे गर्विष्ठ असेल, असे जिनिलियाला वाटले होते. त्यामुळे पहिल्या भेटीतच जिनिलियाने रितेशकडे दुर्लक्ष केले होते.
त्यावेळी रितेशने मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर जिनिलियाने त्याच्याशी हात मिळविला. मात्र चित्रपटात काम करता करता ते एकमेकांना समजू लागले. नंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. चित्रपटाच्या निमित्ताने भेटलेल्या या जोडीच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे त्यांना समजले नाही. नंतर त्यांनी तुझे मेरी कसमनंतर या दोघांनी मस्ती या चित्रपटात पुन्हा एकत्र काम केले. त्यानंतर त्यांचे नाते अधिक फुललं. तब्बल १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. रितेश आणि जिनिलियाला रियान आणि राहील नावाची दोन मुलं आहेत.