'12th फेल' (12th Fail) सिनेमा २०२३ मध्ये चांगलाच गाजला. या सिनेमाला प्रेक्षक - समीक्षकांकडून चांगलंच प्रेम मिळालं. IPS अधिकारी मनोज शर्मा यांच्या आयुष्यावर आधारीत या सिनेमात विक्रांत मेस्सीने (Vikrant Massey) प्रमुख भूमिका साकारली. पण सध्या एका वेगळ्याच प्रकरणामुळे विक्रांत चर्चेत आलाय. एका जुन्या ट्विट प्रकरणामुळे विक्रांतला सर्वांची जाहीर माफी मागावी लागली आहे. नेमकं प्रकरण काय?
जानेवारी २०१८ मध्ये कठुआ आणि उन्नाव प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला. या प्रकरणी विक्रांतचं एक जुनं ट्विट व्हायरल झालंय. विक्रांतने २०१८ साली कठुआ आणि उन्नाव प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त करत प्रभू राम आणि देवी सीता यांच्यातील संभाषणाचे व्यंगचित्र शेअर केले होते. या जुन्या ट्विटमध्ये सीतामाई रामाच्या 'भक्तां'पेक्षा रावणाने पळवून नेल्याबद्दल दिलासा व्यक्त करत आहे. कार्टून कटआउटसोबतच विक्रांतने लिहिले होते की, ''कच्चे (अर्धवट शिजलेले) बटाटे आणि कच्चे राष्ट्रवादी लोक या दोन्हींमुळे आतड्यांमध्ये वेदनाच होतात." #KathuaCase #Unnao #Shame.
या जुन्या व्हायरल ट्विटसाठी विक्रांतला सोशल मीडियावर माफी मागावी लागली आहे. विक्रांतने ट्विट करत लिहीले की, "माझ्या 2018 च्या एका ट्विटच्या संदर्भात, मी काही सांगू इच्छितो... हिंदू समुदायाला दुखावण्याचा, बदनाम करण्याचा किंवा त्यांचा अनादर करण्याचा माझा हेतू कधीच नव्हता. मी अत्यंत नम्रतेने दुखावलेल्या प्रत्येकाची माफी मागू इच्छितो. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की, मी सर्व श्रद्धा आणि धर्मांना सर्वोच्च मानतो. काळ जसा पुढे जातो तसं आपण झालेल्या चुकांवर चिंतन करतो. माझंही तेच झालंय,'' अशा शब्दात विक्रांतने त्याचा माफिनामा लिहिलाय.