टीव्ही ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारा '12th फेल' फेम अभिनेता विक्रांत मेस्सीचं (Vikrant Massey) सध्या सगळीकडूनच कौतुक होतंय. सिनेमातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला फिल्मफेअर क्रिटिक्स चॉईस उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. शिवाय प्रेक्षकांची मिळालेली दाद तर सगळ्यांनीच पाहिली. सिनेमाच्या यशानंतर विक्रांत अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकतेच एका मुलाखतीमध्ये त्यानं बॉलिवूडसेलिब्रिटींना सामाजिक आणि राजकीय गोष्टींवर जाहीरपणे मत मांडण्याच्या परिणामांवर भाष्य केलं.
विक्रांत मेसीनं अनफिल्टर्ड बाय समदीश या यूट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली. यावेळी '2022 मध्ये 'लाल सिंह चड्ढा' रिलीज होत असताना आमिर खानला त्याच्या असहिष्णुतेच्या वक्तव्यामुळे त्रास सहन करावा लागला होता का? बॉलीवूड सेलिब्रिटींना त्यांचे मत जाहीरपणे मांडण्याची किंमत मोजावी लागते का' असा प्रश्न विचारला. यावर विक्रांत म्हणाला, 'होय, आमिर खानला याचा सामना करावा लागला. त्याच्या जुन्या विधानांचा त्याच्या चित्रपटांवर परिणाम झाला. हे सर्व जण करु शकत नाही. कारण प्रत्येकाल आपलं घर चालवायंच आहे'.
बॉलिवूडमध्ये सध्या नसीरुद्दीन शाह राजकीय आणि सामाजिक विषयांवर खुलेपणाने मत व्यक्त करताना दिसून येतात. यावर काय मत आहे, या प्रश्नावर विक्रांत म्हणाला, 'नसीरुद्दीन शाह आता वयाच्या ७० व्या वर्षी आपली मते जाहीरपणे मांडू शकत आहेत. यापूर्वी ते हे करू शकत नव्हते. कारण तेव्हा त्यांचं करिअर घडत होतं. असही म्हणता येईल की त्या काळात सध्या जी परिस्थिती आहे, ती नव्हती. आता सोशल मीडियामुळे आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवणं खूप सोपं झालं आहे. कारण आता ते एका बटणाच्या क्लिकवर सहज उपलब्ध झालं आहे. येथे प्रत्येकाचा स्वतःचा दृष्टिकोन आहे, प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या आहेत'. त्यांची ही मुलाखत सध्या चर्चेचा विषय बनली आहे.