रजनीकांत यांच्या 2.0 या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहे. हा चित्रपट २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून २०१० साली प्रदर्शित झालेल्या रोबोट या चित्रपटाचा हा सिक्वल असणार आहे. हा बिग बजेट चित्रपट असून रजनीकांत त्यांच्या चिट्टी रोबोट या भूमिकेत आठ वर्षांनंतर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे.
रजनीकांत हे दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील सुपरस्टार असल्याने त्यांचा चित्रपट प्रदर्शित होण्याची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. त्यांचा चित्रपट प्रदर्शित होणार तो दिवस त्यांच्या चाहत्यांसाठी एखाद्या सणासारखाच असतो. त्यामुळे अगदी उत्साही वातावरण सध्या त्यांच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. मुंबईतील माटुंगा या परिसरात या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्याआधी विशेष तयारी सुरू आहे. रजनीकांत यांचा चित्रपट प्रदर्शित होतो, त्यावेळी दरवेळेस माटुंग्यामध्ये हेच चित्र पाहायला मिळते. माटुंग्यातील अरोरा या चित्रपटगृहात जोरदार तयारी सुरू असून तिथे रजनीकांत यांचे ६८ फूट उंचीचे कटआऊट लावण्यात आलेले आहे. यापूर्वीही त्यांच्या कबाली आणि काला या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्यावेळी अशाप्रकारचा कटआऊट उभारण्यात आला होता.
२९ नोव्हेंबरला सकाळी चार वाचल्यापासून रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी सुरू होणार आहे. पहाटे चार वाजता पूजेचे आयोजन करण्यात आले आहे आणि त्यानंतर सकाळी सहा वाजता 2.0 या चित्रपटाचा पहिला शो प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या शोला प्रेक्षक प्रचंड गर्दी करणार यात काही शंकाच नाही.
2.0 या चित्रपटात अक्षय कुमार देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय आणि रजनीकांत पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबतच अॅमी जॅक्सन, सुधांशू पांडे, आदिल हुसैन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिट ठरेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एस. शंकर यांचे असून या चित्रपटावर चित्रपटाच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे.