साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार स्टारर ‘2.0’ या चित्रपटाचा टीजर आज रिलीज झाला. अपेक्षेनुसार, हा टीजर एक रोमांचक अनुभव देणारा आहे. हा टीजर पाहिल्यानंतर तुम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी आतूर व्हाल, एवढे नक्की. या टीजरमधील व्हीएफएक्स इफेक्ट थक्क करणारे आहेत. हा चित्रपट रजनीकांतच्या ‘रोबोट’चा सीक्वल आहे, याची आठवण करून देणाऱ्या या टीजरमध्ये रजनीकांत डबलरोलमध्ये आहे. जग धोक्यात आहे आणि ते वाचवण्यासाठी रजनीकांत आणि त्याचा रोबोट अर्थात चिट्टी पुढे सरसावतात. पण डॉ. रिचर्ड त्यांच्या मार्गात संकट बनून उभा राहतो. डॉ. रिचर्डची ही निगेटीव्ह भूमिका अक्षय कुमारने साकारली आहे.
आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदा अक्षय कुमार खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘2.0’मधील त्याची भूमिका हैरान करणारी तर आहेच शिवाय अंगावर काटा आणणारीही आहे.गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या टीजरची प्रतीक्षा होती.पण मेकर्सनी यासाठी गणेश चतुर्थीचा शुभमुहूर्त निवडला. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. यातील व्हिएफएक्स इफेक्टवर थोडे थोडके नाही तर ५४४ कोटी रूपये खर्च केले गेले आहेत. विशेष म्हणजे, ही माहिती खुद्द अक्षय कुमारने आपल्या सोशल अकाऊंटवर दिली आहे. चित्रपटाच्या व्हिएफएक्सवर ५४४ कोटी रूपये खर्च झालेत. चित्रपट बनवण्यासाठी ३ हजारांवर टेक्निशियनची मदत घेतली गेली, अशी माहिती अक्षयने चाहत्यांशी शेअर केली आहे. निश्चितपणे भारतीय चित्रपटांच्या इतिहासात हा एक व्रिकम आहे. आजपर्यंत कुठल्याही चित्रपटाच्या व्हिएफएक्सवर इतका खर्च केला गेलेला नाही. त्यामुळे ‘2.0’ या चित्रपटाला भारतातील सर्वात महागडा चित्रपट म्हणणे गैर होणार नाही. हा संपूर्ण चित्रपट ३-डीमध्ये शूट केला गेला. हेही भारतात पहिल्यांदाच झाले आहे. याचवर्षी २९ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. तामिळ आणि हिंदीमध्ये हा चित्रपट रिलीज होईल. यानंतर १३ अन्य भाषांत तो डब केला जाईल.