Year End 2022, Bollywood : 2022 वर्षाला निरोप देण्याची वेळ जवळ आलीये. प्रत्येक वर्षात काही चांगलं घडतं, काही वाईट. यंदाचं वर्ष बॉलिवूडकरांसाठी ‘कभी खुशी कभी गम’ देणारं ठरलं. दरवर्षी सारखे या वर्षातही बॉलिवूडने काही वाद ओढवून घेतले. याच ‘कॉन्ट्रोव्हर्सी ऑफ द इअर’ वर आपण आज एक नजर टाकणार आहोत.
द काश्मीर फाइल्स हा यावर्षी रिलीज झालेला सिनेमा यावर्षीचा सर्वात मोठा मुद्दा बनला. बॉलिवूड,राजकारण, समाजकारण सगळीकडे याच चित्रपटाची चर्चा रंगली. काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर बेतलेल्या या सिनेमाला काहींनी प्रोपगंडा म्हटलं तर काही या सिनेमाचं कौतुक केलं. या सिनेमामुळे बॉलिवूड दोन गटात विभागलं गेलं. नुकतंच इस्रायली दिग्दर्शक नादव लॅपिड यांनी या चित्रपटाला प्रोपगंडा व वल्गर संबोधून नवा वाद निर्माण केला होता.
रणवीर सिंगने या वर्षांत स्वत:हून वाद ओढवून घेतला. होय, एका मासिकासाठी त्याने न्यूड फोटोशूट केलं आणि वातावरण तापलं. रणवीरच्या या फोटोशूटवरून सोशल मीडियासह राज्यात बराच गदारोळ झाला होता. या वादग्रस्त फोटोशूटमुळे रणवीरवर गुन्हा दाखल झाला होता.
2022 मध्ये ‘काली’ या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवरून बराच वाद झाला होता. या डॉक्युमेंट्रीचे दिग्दर्शक लीना मनिमेकलाई यांनी‘काली’चे पोस्टर शेअर केलं होतं. या पोस्टरमध्ये कालीच्या रुपात एक मुलगी सिगारेट ओढताना दिसत आहे, यावरून वाद झाला होता. यानंतर लीनावर हरिद्वारमध्ये हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
अजय देवगण आणि किच्चा सुदीप यांच्या वादाची ठिणगी या वर्षात पडली. कोरोना काळानंतर साऊथच्या एका एका सिनेमानं बॉलिवूडला घाम फोडला. यामुळे साऊथ विरूद्ध बॉलिवूड असा वाद निर्माण झाला. यातच किच्चा सुदीपने हिंदी भाषेवरून एक वादग्रस्त ट्विट केलं. हिंदी कधीपासून राष्ट्रभाषा झाली? असं तो म्हणाला. अजयने त्याला लगेच उत्तर दिलं. ‘असं असेल तर तुम्ही तुमचे सिनेमे हिंदीत डब का करता?’ असा सवाल अजयने केला.
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा बहुचर्चित चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा या वर्षात बायकॉटचाबबळी ठरला. गेल्यावर्षी आमिरने देशातील असहिष्णुतेबद्दल दिलेल्या वक्तव्यामुळे लोक नाराज आहेत. याच नाराजीतून लोकांनी या सिनेमाला लक्ष्य करत, बायकॉट मोहिम सुरू केली. सोशल मीडियावर ‘बायकॉट लाल सिंह चड्ढा’ ट्रेंड चर्चेत राहिला. याचा परिणाम म्हणजे ‘लाल सिंह चड्ढा’ फ्लॉप झाला.
रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ या वषार्तील सुपरहिट चित्रपटांच्या श्रेणीत आला आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान रणबीर कपूर व आलिया भट उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मात्र लोकांनी त्यांना मंदिरात जाण्यास मज्जाव केला. रणबीरने हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप यावेळी झाला. मी गोमांस खातो, असं रणबीर एका जुन्या मुलाखतीत म्हणाला होता. या जुन्या व्हिडीओवरूनच सगळा राडा झाला.
फाल्गुनी पाठक व नेहा कक्करची कॉन्ट्रोव्हर्सी या वर्षात पाहायला मिळाली. नेहाने ‘मैंने पायल है छनकाई’ या सिनेमाचं रिमिक्स व्हर्जन बनवलं आणि ते पाहून फाल्गुनी भडकली. फाल्गुनीने नेहावर तिखट शब्दांत टीका केली. हे गाणं रिलीज झाल्यानंतर नेहा कक्कर लोकांच्या निशाण्यावर आली. अनेक सिंगर्स या वादात उतरले.