ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 15 - दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांतने तब्बल 9 वर्षानंतर आज आपल्या चाहत्यांची भेट घेतली. सोमवारी सकाळी चेन्नईच्या राघवेंद्र हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. लाखो लोकांच्या गळयातील ताईत असलेल्या रजनीकांतबरोबरची भेट म्हणजे चाहत्यांसाठी एक पर्वणी होती. चाहत्यांशी संवाद साधताना रजनीकांतने यावेळी राजकीय भाष्यही केले. रजनीकांत पुढचे चार दिवस 17 जिल्ह्यातील त्याच्या चाहत्यांना भेटून त्यांच्यासोबत व्यक्तीगत फोटो काढणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील रजनीच्या 200 ते 250 फॅन्सना या कार्यक्रमाचे पासेस देण्यात आले आहेत. 2008 साली अशा प्रकारने रजनीने चाहत्यांशी थेट संवाद साधला होता.
या कार्यक्रमात बोलताना रजनी म्हणाला की, मी उद्या राजकारणात प्रवेश केलाच तर, चुकीच्या लोकांना माझ्या पक्षात स्थान मिळणार नाही. 21 वर्षांपूर्वी एका राजकीय आघाडीला पाठिंबा जाहीर करुन मी चूक केली होती. तो एक राजकीय अपघात होता. राजकीय पक्षांना फक्त माझ्या नावाचा वापर करुन मते मिळवायची असतात असे रजनीकांत म्हणाले.
रजनीकांत यांनी एप्रिल महिन्यात चाहत्यांना भेटणार असल्याचे जाहीर केले होते. चाहत्यांसोबत ग्रुप फोटो काढायचे आधी ठरले होते. पण चाहत्यांच्या आग्रहाखातर त्यांनी प्रत्येकासोबत व्यक्तीगत फोटो काढण्याचा निर्णय घेतला. रजनीकांत यापूर्वी कबालीमधून प्रेक्षकांना भेटले होते. मलेशियातील एका डॉनची भूमिका त्यांनी केली होती. पुढच्यावर्षी जानेवारी महिन्यात त्यांचा 2.0 चित्रपट प्रदर्शित होईल. शंकर दिग्दर्शित करीत असलेला हा चित्रपट रोबोटचा दुसरा भाग आहे. अक्षय कुमार आणि अॅमी जॅक्सन सुद्धा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.