गत १६ आॅक्टोबरला शाहरूख खान-काजोलच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झालेत आणि आज १९ आॅक्टोबरला शाहरूख- काजोलच्या ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ या चित्रपटाने २३ वर्षे पूर्ण केलीत.शाहरूख- काजोलच्या या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकलीत. ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ या चित्रपटाने सगळ्यांनाच वेड लावले. प्रेक्षकांनी हा चित्रपट अक्षरश: डोक्यावर घेतला. शाहरूख खान आणि काजोलचा हा चित्रपट आठवला तरी मूड रोमॅन्टिक होतो. सर्वाधिक काळ चित्रपटगृहात झळकण्याचा विक्रम नावावर असलेला चित्रपट आजही सिनेप्रेमींच्या मनात घर करून बसला आहे.‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ला २३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या चित्रपटाच्या सेटवरचे तुम्ही कधीही न पाहिलेले फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे फोटो तुमच्या सगळ्या आठवणी पुन्हा ताज्या करतील, यात शंकांच नाही...
तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल की, डीडीएलजेमधील राजच्या भूमिकेसाठी सैफ अली खान पहिली पसंत होता. पण नंतर शाहरूखला हा प्रस्ताव दिला गेला. सुरूवातीला शाहरूखनेही हा चित्रपट नाकारला होता.
राजची भूमिका माज्यासाठी माइलस्टोन ठरली. माझे संपूर्ण जीवन या चित्रपटाने बदलले़ या चित्रपटाने मला रोमान्सचा बादशाह बनवले़ पण हीच भूमिका मी सुरवातीला नाकारली होती. कारण ‘बाजीगर’, ‘डर’च्या यशाने माझ्या नकारात्मक व्यक्तिरेखाच प्रेक्षकांना आवडताहेत अशी समजूत होती.त्यातुलनेत डीडीएलजे मला जरा जास्तचं रोमॅन्टिक वाटला होता. पण यश चोप्रांना नकार देऊ शकलो नाही, असे शाहरूखने एका मुलाखतीत सांगितले होते. या चित्रपटाचे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या सिनेमाचे शीर्षक किरण खेर यांनी सुचवले होते. तेव्हा एवढ्या लांबलचक शीर्षकाचा कधी चित्रपट असतो का, असा अनेकांचा प्रश्न होता.