बॉलिवूडच्या इतिहासात तुफान गाजलेला सिनेमा म्हणजे कुछ कुछ होता हैं. शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. हा सिनेमा रिलीज होऊन जवळपास २५ वर्ष झाली आहेत. मात्र, त्याची क्रेझ जराही कमी झालेली नाही. आजही या सिनेमातील डायलॉग्स, गाणी प्रचंड लोकप्रिय आहेत. या सिनेमातील तुझे याद ना मेरी आए हे गाणं आजही सुपरहिट म्हणून ओळखलं जातं. परंतु, हे गाणं एका दुसऱ्याच सिनेमासाठी तयार करण्यात आलं होतं. अलिकडेच ललित पंडित यांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे.
'कुछ कुछ होता हैं' या सिनेमात एकूण ८ गाणी आहेत. या सिनेमातील गाण्यांची जबाबदारी आदित्य चोप्रा यांनी जतिन-ललित यांच्यावर सोपवली होती. जतिन-ललित आणि करण जोहर यांची पहिली भेट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सिनेमासाठी करण जोहर, आदित्यला असिस्ट करत होता. विशेष म्हणजे करण जोहरच्या कुछ कुछ होता हैं या सिनेमासाठीही जतिन-ललित यांनीच गाण्याची जबाबदारी सांभाळली होती. या सिनेमातलं तुझे याद न मेरी आए हे गाणं त्यावेळी प्रचंड गाजलं. मात्र, हे गाणं दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या सिनेमासाठी तयार करण्यात आलं होतं.
"तुझे याद ना मेरी आए... हे गाण खरं तर दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या सिनेमासाठी तयार करण्यात आलं होतं. या गाण्यासाठी प्रसिद्ध पंजाबी गायक मनप्रीत अख्तर यांना बोलवण्यात आलं होतं. पण त्यावेळी हे गाणं दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेमध्ये कुठेच वापरलं नव्हतं. त्यामुळे ते गाणं जवळपास सगळेच विसरले होते. मात्र, यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला यांच्या ते लक्षात होतं. त्यांनी कुछ कुछ होता हैंचं कथानक ऐकलं आणि हे गाणं या सिनेमासाठी परफेक्ट असल्याचं सांगितलं. तेव्हा त्यांनी या गाण्याविषयी करणसोबत चर्चा केली. जतिन-ललितकडे एक गाणं आहे असं त्यांनी करणला सांगितलं. आणि, त्यानंतर कुछ कुछ होता हैंमध्ये या गाण्याची एन्ट्री झाली," असं ललित यांनी सांगितलं.