प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक मैलाचा दगड येणं महत्वाचं असतं जिथून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते. तसंच काहीस झालं, अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या बाबतीत.. २९ एप्रिल, २०१६ला सैराट चित्रपट रिलीज झाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आर्चीनं आपल्या अदांनी आणि डायलॉग्जनी याड लावलं. एका रात्रीत रिंकू राजगुरू स्टार झाली. कमी वयात तिनं स्टारडम अनुभवलं. शालेय शिक्षण होण्याआधीच ध्यानीमनी नसताना रिंकू राजगुरू सैराटमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचली. इतकंच नाही तर तिनं राष्ट्रीय पुरस्कारावरही आपलं नाव कोरलं. 'सैराट' रिंकूच्या कारकीर्दीचा टर्निंग पॉइंट ठरला.
'सैराट' चित्रपटाचं माझ्या मनातील स्थान मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. माझा पहिलाच चित्रपट... आणि मी कधीच विचार केला नव्हता की पहिल्याच चित्रपटासाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल. जगभरात चित्रपट पोहचला. या चित्रपटातून मी घराघरात पोहचू शकले. खरं तर सैराट चित्रपटानं रिंकू राजगुरूला ओळख दिली. त्यामुळे मी आज इथवर पोहचू शकले. सैराट माझ्या खूप जवळचा आहे असे रिंकू सांगत होती.
रिंकू राजगुरूने चित्रपटात काम करण्याचा अनुभव पहिल्याच होता. त्यामुळे शूटिंग, सेट आणि सगळं काही तिच्यासाठी नवीन होतं. याबद्दल सांगताना ती म्हणाली की, पहिलाच अनुभव होता आणि प्रत्येक क्षण नव्यानं जगल्यासारखं होते. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीत मजा होती. प्रत्येक गोष्ट नवीन होती आणि त्याचं खूप कुतूहुल होतं. तितकीच मजा यायची. दरवेळी असं वाटायचं की मागच्या वेळेपेक्षा हे जास्त छान झालंय आणि यापेक्षा हे जास्त भारी झालंय, असं पूर्ण शूट होईपर्यंत आम्हाला वाटायचं. त्यामुळे असे या चित्रपटाशी निगडीत अशा खूप अविस्मरणीय आठवणी आहेत. बोलेन तितकं कमीच आहे.
सैराट माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटानं मला खूप काही दिलंय.पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, एका रात्रीत ओळख मिळाली. या चित्रपटानं माझं आयुष्य बदलून टाकल्याचं रिंकूनं सांगितलं.
सैराटला ५ वर्षे नुकतेच पुर्ण झाली असली तरी चित्रपटातील टीम एकमेकांना भेटत असतात. मात्र कोरोनामुळे त्यांना भेटणं शक्य झालं नाही. याबद्दल रिंकू म्हणाली की, भेटल्यावर आम्ही सर्वजण खूप गप्पा मारतो, धमाल करतो. नवीन चित्रपटांबद्दल, काय वाचलं पाहिजे, यावर सगळे बोलायचो. स्वतःवर कोणत्या गोष्टीवर काम केले पाहिजे, यावर चर्चा व्हायची. या सगळ्या गोष्टी मी मिस करतेय