मेरा नाम नोकर या चित्रपटाला आज ५० वर्षं पूर्ण झाले. राज कपूर यांच्यासाठी हा चित्रपट खूपच महत्त्वाचा होता. हा चित्रपट दिग्दर्शित करताना हा चित्रपट प्रेक्षक डोक्यावर घेतील याची राज कपूर यांना खात्री होती. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही वेगळेच चित्र त्यांना पाहायला मिळाले. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पूर्णपणे पाठ फिरवली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः आपटला. राज कपूर यांनी मेरा नाम जोकर हा चित्रपट बनवताना प्रचंड मेहनत घेतली होती. या चित्रपटाचा विषय, या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, गाणी सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील असे त्यांना वाटले होते. पण या चित्रपटाला मिळालेल्या अपयशामुळे त्यांना प्रचंड वाईट वाटले होते.
मेरा नाम जोकर हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी प्रचंड खर्च केला होता. हा चित्रपट पूर्ण व्हायला जवळपास पाच ते सहा वर्षे लागले होते. या चित्रपटासाठी राज कपूर यांच्या पत्नींना त्यांचे दागिने विकावे लागले होते. कपूर कुटुंब कर्जबाजारी झाले होते. मेरा नाम जोकर या चित्रपटाची लांबी खूपच जास्त असल्याने या चित्रपटाला दोन मध्यांतरं होती. कोणत्याही हिंदी चित्रपटाला दोन मध्यांतरं असण्याची ही पहिलीच वेळ होती.
मेरा नाम जोकर या चित्रपटाची त्याकाळात आणखी एका गोष्टीमुळे चर्चा झाली होती. या चित्रपटात एका दृश्यात अभिनेत्री न्यूड दाखवण्यात आली होती. त्याकाळात अशाप्रकारचे दृश्य चित्रपटात दाखवण्यात आल्यामुळे त्या दृश्याची चांगलीच चर्चा रंगली होती. सिमी गरेवाल यांनी या चित्रपटात न्यूड सीन दिला होता.
१८ डिसेंबर, १९७० साली मेरा नाम जोकर चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबत निर्मितीदेखी राज कपूर यांनी केली होती. या चित्रपटात मुख्य भूमिकेत राज कपूर होते. या सोबतच धर्मेंद्र, मनोज कुमार, सिमी गरेवाल, ऋषी कपूर आणि दारा सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या. मेरा नाम जोकर प्रदर्शित झाल्यानंतर सुपरफ्लॉप झाला होता. मात्र काही वर्षांनंतर हा चित्रपट लोकांना खूप भावला. आजही हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो.