Join us

बाहुबलीनंतर 500 कोटींचा रामायण चित्रपट येणार मोठ्या पडद्यावर

By admin | Published: May 10, 2017 5:59 PM

आता लवकरच बिग बजेट असलेला 500 कोटींचा रामायण हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 10 - बाहुबली 2नं देशातल्या चित्रपटांचे सर्व विक्रम मोडत 1000 कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला आहे. 1000 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा हा एकमेव भारतीय सिनेमा ठरला असतानाच आता लवकरच बिग बजेट असलेला 500 कोटींचा रामायण हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. बाहुबली आणि बाहुबली 2 या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर काही चित्रपट निर्मात्यांनी एकत्र येऊन रामायणावर चित्रपट बनवण्याची तयारी केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी मोठ्या बजेटवाला महाभारत चित्रपट बनवणार असल्याचं जाहीर केलं होतं. 1000 कोटींच्या बजेटवाला महाभारत हा चित्रपट चर्चेत असतानाच आता लवकरच 500 कोटींचा रामायण चित्रपट बनवण्याचंही काही चित्रपट निर्मात्यांनी जाहीर केलं आहे. बाहुबलीसारख्या मोठ्या चित्रपटांनंतर स्टार वॉर्स, ट्रान्सफॉर्मर, एक्स मॅन यांसारख्या चित्रपटांचे निर्माते राहिलेल्या नमित मल्होत्रा, मधू मंटेना आणि "गजनी" चित्रपटाचे निर्माते अल्लू अरविंद मिळून 500 कोटींच्या बजेटवाला रामायण चित्रपट आणण्याच्या तयारीत आहेत. थ्रीडीमधील हा चित्रपट महाकाव्य रामायणावर आधारित आहे. तसेच थ्रीडीमधला रामायण हा चित्रपट हिंदीसह तेलुगू आणि तामीळ भाषेतही बनवला जाणार आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, बाहुबली दोन भागांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. तर रामायण हा तीन भागांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. निर्मात्यांच्या मते, रामानंद सागर यांच्या रामायणानंतर 2008मध्ये सागर आर्ट्सची रामायण मालिका आली होती. त्यानंतर मोठ्या पडद्यावर रामायण कधीच दाखवण्यात आलं नाही. त्यामुळे आम्ही या महाकाव्याला मोठ्या पडद्यावर दाखवणार असल्याचं या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितलं आहे.