तमाम चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेले सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर झाला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरूवारी याबाबतची घोषणा केली. अभिनय क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना जाहीर झाल्याने त्यांच्यावर चहुबाजूने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (Rajinikanth to be honoured with 51st Dadasaheb Phalke Award, says Prakash Javadekar)
दादासाहेब फाळके पुरस्कार (dadasaheb phalke award) हा भारतीय सिनेक्षेत्रातील कामगिरीसाठी केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. कोरोना महामारीमुळे यंदा सर्व पुरस्कारांची घोषणा विलंबाने झाली. नुकतीच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली होती.
आज प्रकाश जावडेकर यांनी एका पत्रकार परिषदेत प्रकाश जावडेकर यांनी दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा केली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना घोषित करताना मला अत्यानंद होतोय. रजनीकांत गेल्या पाच दशकांपासून सिनेजगतावर अधिराज्य गाजवत असून लोकांचे निखळ मनोरंजन करत आहे. त्याचमुळे ज्युरींनी त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला, असे जावडेकर म्हणाले.
साऊथ फिल्म इंडस्ट्रीत देवासारखे पुजले रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. 12 डिसेंबर 1950 रोजी बेंगळुरुतील एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांचा प्रवास अद्भूत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांच्याइतकी लोकप्रियता कुणालाच मिळवता आली नाही. आजही रजनीकांत यांचा चित्रपट प्रदर्शित झाला की, चाहते पहाटे पासून चित्रपटगृहांबाहेर रांगा लावतात. रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या स्वागतासाठी वाजत गाजत मिरवणुका निघतात.
काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी सक्रिय राजकारणात येण्याची घोषणा केली होती. नव्या वर्षाच्या मुहूर्तावर ते आपल्या राजकीय पक्षाची घोषणाही करणार होते. मात्र अचानक रजनीकांत यांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ रूग्णालयात हलवण्यात आले. बरे होऊन घरी परतल्यावर, रजनीकांत यांनी प्रकृतीचे कारण देत सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहिर केले होते.