गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूने (Corona virus) संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. या विषाणूने हाहाकार सुरु असतांनाच आता ओमायक्रोन (Omicrone) या नव्या व्हेरियंटने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्येच आता या विषाणूचा परिणाम ग्रॅमी अॅवॉर्ड 2022 वरदेखील झाला आहे. या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रॅमी अॅवॉर्ड 2022 यावर्षी स्थगित करण्यात आला आहे. याविषयी Recording Academy / GRAMMYs या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर माहिती देण्यात आली आहे.
संगीत क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा आणि मानाचा म्हणून ग्रॅमी अॅवॉर्डकडे पाहिलं जातं. यंदा अमेरिकेतील लॉस अँजलेस येथे 64 वा ग्रॅमी अॅवॉर्ड (64th Grammy Awards) पुरस्कार सोहळा रंगणार होता. परंतु, कोविडच्या पार्श्वभूमीवर तो स्थगित करण्यात आला आहे.
'शहरातील-राज्यातील संबंधित अधिकारी, आरोग्य अधिकारी आणि विविध सामाजिक संस्था यांच्यासोबत विचारविनिमय केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे. आमच्यासाठी आमचा प्रेक्षकवर्ग, पाहुणे आणि कर्मचारी हे सर्वात प्रथम आहेत. त्यामुळे या सगळ्याचा विचार करुन यंदा पार पडणारा 64 वा ग्रॅमी अॅवॉर्ड काही काळासाठी स्थगित करण्यात येत आहे. तसंच योग्य वेळ आल्यानंतर या सोहळ्याचं पुन्हा आयोजन केलं जाईल. त्यामुळे लवकरच या सोहळ्याची नवीन तारीख कळवू, असं Recording Academy / GRAMMYs यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
दरम्यान, यापूर्वी २०२१ मध्येदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ग्रॅमी अॅवॉर्ड पुढे ढकलण्यात आला होता. जानेवारी महिन्यात रंगणारा हा सोहळा मार्च महिन्यात पार पडला होता. त्यामुळे २०२२ चा हा सोहळा नेमका कधी रंगणार याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.