अहमदनगर : नगरच्या मातीत तयार झालेल्या ‘कुंकुमार्चन’ या कौटुंबिक मूल्य असलेल्या लघुपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘कुंकुमार्चन’वर राष्ट्रीय मोहर उमटल्यामुळे लघुपटातील माय-लेकाच्या संघर्षाला सर्वोत्तम बहुमान मिळाला आहे.
यंदाच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा दिल्ली येथे शुक्रवारी करण्यात आली. यात नगरमधील ‘कुंकुमार्चन’ या लघुपटाला नॉन फिचर फिल्म या गटात पुरस्कार जाहीर झाला. उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या अनुष्का मोशन पिच्चर्सची प्रस्तुती असलेल्या या लघुपटाचे दिग्दर्शन अभिजित दळवी यांनी केले आहे. या लघुपटात बंडू झिंजुरके, विद्या जोशी यांची भूमिका आहे. एका दिव्यांग मुलाची व त्याच्या आईची गोष्ट या लघुपटात दाखविण्यात आली आहे.
या दिव्यांग मुलाला पायात घालण्यासाठी चप्पल घ्यायची असते. त्यासाठी त्याचा संघर्ष सुरू असतो. त्याचवेळी तो छत्रपती शिवाजी महाराजांवरील एक पुस्तक वाचतो आणि त्याचे स्वप्न बाजूला ठेवून प्रथम आईला चप्पल घेण्याचे स्वप्न पाहतो. त्यासाठी त्याचा संघर्ष सुरू होतो, अशी एकंदर या लघुपटाची कथा आहे. २०२० मध्ये या लघुपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण चित्रीकरण नगर शहर व नगरजवळील जेऊर बायजाबाई व डोंगरगण येथे झालेले आहे. लघुपटाला आदित्य बेडेकर यांनी संगीत दिले असून, सारंग देशपांडे यांनी साऊंडची जबाबदारी सांभाळलेली आहे.
या चित्रपटाची मूळ कथा कौस्तुभ केळकर यांची आहे. संपूर्ण टीम नगरमधील असून सर्वांच्या सहकार्याने राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचली. पहिले लॉकडाऊन संपल्यानंतर ही फिल्म तयार केली. या फिल्मला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार अहमदनगरसाठी अभिमानास्पद आणि भूषणावह ठरला आहे.- अभिजित दळवी, दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक