68th National Film Awards: ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्यांमध्ये साऊथ, बॉलिवूड चित्रपटांसह मराठीतील 'गोष्ट एका पैठणीची' (goshta eka paithanichi) या चित्रपटानेही बाजी मारली आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून 'फनरल' या चित्रपटाला गौरविण्यात आले. तर सर्वोत्कृष्ट बालचित्रपट राष्ट्रीय पुरस्कार सुमी सिनेमाला जाहिर झाला आहे.
या सिनेमाचं दिग्दर्शन अमोल गोळे यांनी केलंय तर संजीव झा सिनेमाचे लेखक आहेत. हर्षल कामत एंटरटेनमेंट यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.आकांक्षा पिंगले आणि दिव्येश इंदुलकर यांना सुमी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पारितोषिक मिळाले.
अमोल गोळे - दिग्दर्शक - सुमी'सुमी' हा चित्रपट लहान मुलीच्या संघर्षावर आधारीत आहे. अत्यंत गरीब मुलीची कथा यात आहे. याचे पहिले क्रेडिट आकांक्षा पिंगळे आणि दिव्येश इंदुलकर या दोन बालकलाकारांना देतो. आकांक्षा ही पुण्यातील अतिसामान्य कुटुंबातील मुलगी आहे. या दोघांनी खूप चांगले काम केल्याने राष्ट्रीय पुरस्कार नाव कोरण्यात यश मिळाले. या पुरस्काराचे दुसरे श्रेय मी माझे गुरू दिग्दर्शक अमोल गुप्ते यांना देईन. त्यांच्यासोबत राहून जे काही शिकलो ते 'सुमी'त मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या देशात संघर्ष करून शिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रत्येक मुलाला हा पुरस्कार मी समर्पित करतो, असे दिग्दर्शक अमोल गोळे म्हणाले.
दिव्येश इंदुलकर - बालकलाकार, सुमी'सुमी' चित्रपटापूर्वी मी लहान सहान भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात मला प्रथमच मुख्य भूमिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि या चित्रपटासाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. आई-बाबांच्या डोळ्यांतील आनंद स्पष्टपणे पहायला मिळत आहे. या चित्रपटात मी चिन्याची भूमिका साकारली आहे. या चिन्यानेच राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला आहे. बालमोहन शाळेतील शिक्षक आणि मित्रांनी खूप सहकार्य केले. विशेषत: माझ्या चित्रा मावशीने बालपणापासून सहकार्य केल्याने इथवर पोहोचलो, असा दिव्येश म्हणाला.