मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ६९व्या राष्ट्रीय पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. गुरुवारी (२४ जुलै) या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी समोर आली आहे. यामध्ये दोन मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरलं आहे.
मराठी अभिनेताजितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ चित्रपटाला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘गोदावरी’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पुरस्कार देण्यात आला आहे. जितेंद्र जोशी मुख्य भूमिकेत असलेल्या ‘गोदावरी’ चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केलं आहे. ‘गोदावरी’ चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर जितेंद्र जोशीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
“स्वप्न पूर्ण करण्याचं धाडस तुझ्याकडे आहे, हे मला माहीत होतं. खूप अडथळे येऊनही तो डगमगला नाही. अपयश आल्यानंतरही त्याने हार मानली नाही. सिनेमावर प्रेम करणारी माणसं कधीत हार मानत नाहीत. आज सगळे त्याचं कौतुक करत असताना मी त्याच्या पालकांचे आभार मानतो. अनिल काका आणि अल्का काकूने त्याला पाठिंबा देत या क्षेत्रात काम करण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिलं. त्याच्या या प्रवासात त्याला प्रेरित करणाऱ्या आणि त्याच्यावर टीका करणाऱ्या सगळ्यांचे आभार. गोदावरी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचीही यात खूप मेहनत आहे. तुला मिळालं म्हणजे मला मिळालं,” असं म्हणत जितेंद्र जोशीने दिग्दर्शकाचं कौतुक केलं आहे.
निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ हा चित्रपट ११ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जितेंद्र जोशीसह विक्रम गोखले, गौरी नलावडे, नीना कुलकर्णी, संजय मोने या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘गोदावरी’ चित्रपटाला अनेक जागतिक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. या चित्रपटाची २०२१ च्या भारतातील सर्वोत्तम १० चित्रपटांमध्ये निवड करण्यात आली. तसंच न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये ओपनिंग फिल्म म्हणून निवड करण्यात आली होती. 'गोदावरी'बरोबरच ‘एकदा काय झालं’ या चित्रपटानेही राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलं आहे. डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित अभिनेता सुमीत राघवन आणि उर्मिला कोठारे यांची मुख्य भूमिका असलेल्या 'एकदा काय झालं सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कार आपली मोहर उमटवली आहे.