सचिन पिळगावकरांचे सिनेमे आजही पाहिले की ते आपल्याला खळखळून हसवतात. सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या त्रिकूटाने मराठी चित्रपटसृष्टीला एक सुवर्णकाळ दाखवला आहे. या तिघांचा असाच एक अजरामर सिनेमा म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'. सचिन पिळगावकर दिग्दर्शित हा सिनेमा मराठीतील क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. या सिनेमातील सर्वच डायलॉगने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. या सिनेमातील असाच एक डायलॉग म्हणजे ७० रुपये वारले. या डायलॉगमागची कहाणी खऱ्याखुऱ्या घटनेवर आधारीत आहे. सचिन पिळगावकरांनीच याविषयी सांगितली.
७० रुपये आणि इस्त्रायलचं औषध ही खरी घटना
focusedindian या यूट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकरांनी ७० रुपये आणि इस्त्रायलचं औषध यामागची कहाणी सांगितली. सिनेमाचे लेखक वसंत सबनीस यांच्या खऱ्या आयुष्यात घडलेली ही घटना होती. वसंत सबनीय यांना डायबिटीस होतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या इस्त्रायलमध्ये राहणाऱ्या मित्राला ७० रुपये देऊन डायबिटीसचं औषध मागवलं होतं. खऱ्या आयुष्यात घडलेल्या या घटनेचा वापर लेखक वसंत सबनीस यांनी 'अशी ही बनवाबनवी' सिनेमात केला.
सिनेमात ७० रुपये आणि इस्त्रायलचा संदर्भ काय?
ज्यांनी 'अशी ही बनवाबनवी' सिनेमा पाहिला असेल त्यांना वेगळं सांगायची गरज नाही. तरीही सांगायचं तर, धनंजय माने (अशोक सराफ) यांचे घरमालक विश्वास सरपोतदार (सुधीर जोशी) यांना डायबिटीस असतो. एकदा धनंजय माने खोटं कारण देत विश्वास सरपोतदार यांच्याकडून ७० रुपये उकळतो. मित्र इस्त्रायलला असून तो तिकडून डायबिटीसचं औषध पाठवेल, अशी थाप तो मारतो. पुढे जेव्हा धनंजय माने जागा सोडतात तेव्हा विश्वास सरपोतदार त्यांना ७० रुपये आणि इस्त्रायलच्या औषधाबद्दल विचारतात. तेव्हा माझा मित्र इस्त्रायलला वारला, त्यासोबत तुमचे ७० रुपयेही वारले, असं खोटं सांगतो. हा डायलॉग आजही ऐकला की आपल्या चेहऱ्यावर हसू येतं.