दिवाळीचा फराळ विकून कोट्याधीश झालेल्या बऱ्याच लोकांबद्दल आपल्याला ऐकायला मिळत असते. असेच एक कुटुंब आहे ते म्हणजे गोडबोले कुटुंब. गोडबोलेंच्या फराळाला थेट परदेशातून मागणी असते. आता तर गोडबोलेंच्या दिवाळीच्या फराळाची उलाढाल कोटींच्या घरात आहे. वाचून आश्चर्य वाटेल पण एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा नवरा हा सगळा कोट्यावधींचा व्याप सांभाळतो. ही अभिनेत्री म्हणजे किशोरी गोडबोले.
अभिनेत्री किशोरी गोडबोले (Kishori Godbole)चा नवरा सचिन गोडबोलें(Sachin Godbole)चे दादरमध्ये खास मराठी घरगुती खाद्य पदार्थाचे अर्थात फराळाचे दुकान आहे. सचिन गोडबोले यांच्या आई सुमती गोडबोले यांनी अगदी पाच पदार्थ विकून हा व्यवसाय उभा केला होता. त्यांचा मुलगा सचिन हा जपानमधील एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता. पण वडिलांच्या निधनानंतर आईने त्याला नोकरी सोडून त्यांचा व्यवसाय सांभाळायला सांगितले आणि मुलाने आईच्या या शब्दाखातर उच्च पदाची नोकरी सोडली.
माधुरी दीक्षित डॉ. नेनेंशी लग्न होऊन अमेरिकेत स्थायिक झाली होती तेव्हा तिच्या घरीदेखील याच गोडबोलेंचा फराळ पोहोचायचा. हळूहळू गोडबोलेंच्या या फराळाची परदेशात राहणाऱ्या भारतीयांमध्ये खूप ख्याती पसरली आणि या फराळाची मागणी खूप वाढली. त्यानंतर त्यांनी दिवाळी फराळासोबत ड्रायफ्रुट आणि पॅकेटिंग पदार्थांचा देखील समावेश केला. हळूहळू हा बिझनेस वाढत गेला.