Join us

'मी श्रेयस म्हणूनच ठीक'; चाहत्याने केली विजय थलपतीसोबत श्रेयसची तुलना, अभिनेत्याने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 12:12 PM

Shreyas talpade: श्रेयसने चाहत्याला दिलेल्या उत्तराची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे (shreyas talpade). मराठीसह बॉलिवूडमध्येही श्रेयसने त्याची छाप उमटवली आहे. त्यामुळे आज त्याचा मोठा चाहतावर्ग असल्याचा दिसून येतो. यामध्येच श्रेयसच्या एका चाहत्याने त्याची तुलना थेट साऊथ स्टार विजय थलपती याच्यासोबत केली. चाहत्याने केलेल्या या कमेंटवर श्रेयसने नुकतंच उत्तर दिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून श्रेयस सातत्याने चाहत्यांच्या चर्चेत येत आहे. मध्यंतरी श्रेयस त्याच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चर्चेत आला होता. श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. मात्र, आता तो बरा आहे. विशेष म्हणजे श्रेयस आता लगेच त्याच्या कामाकडे वळला असू नुकताच तो श्रीदेवी प्रसन्न या सिनेमातील एका धमाकेदार गाण्यात दिसला. हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच त्या गाण्याच्या व्हिडीओवर एका चाहत्याने कमेंट करत श्रेयसची तुलना विजय थलपतीसोबत केली.

सिद्धार्थ चांदेकर (siddharth chndekar) आणि सई ताम्हणकर (sai tamhankar) यांचा 'श्रीदेवी प्रसन्न' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या सिनेमातील दिल में बजी गिटार हे पहिलंवहिलं गाणं रिलीज झालं. विशेष म्हणजे या गाण्यात श्रेयसची झलक पाहायला मिळाली. हे गाणं रिलीज झाल्यावर सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये श्रेयसला पाहिल्यानंतर त्याच्या एका चाहत्याने, “मराठी इंडस्ट्रीचा विजय थलपती आहेस तू श्रेयस,” अशी कमेंट करत त्याचं कौतुक केलं. 

चाहत्याची ही कमेंट वाचून श्रेयस सुद्धा भारावून गेला आणि त्याने या चाहत्याला रिप्लाय दिला. "बापरे! मित्रा..धन्यवाद. तुझे खूप आभार. पण, मी श्रेयस म्हणूनच ठीक आहे रे", असं उत्तर श्रेयसने दिलं.

दरम्यान, ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात श्रेयस कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे. या सिनेमातील नुकतंच रिलीज झालेलं दिल में बजी गिटार हे गाणं २००६ साली रिलीज झालेल्या अपना सपना मनी मनी या सिनेमातील गिटार साँगचं  मराठी वर्जन आहे. या बॉलिवूड सिनेमात श्रेयस झळकला होता. त्यामुळे १८ वर्षानंतर पुन्हा एकदा त्याला श्रीदेवी प्रसन्न सिनेमाच्या निमित्ताने या गाण्यावर थिरकण्याची संधी मिळाली. 

टॅग्स :श्रेयस तळपदेसई ताम्हणकरसिद्धार्थ चांदेकरसिनेमाबॉलिवूड