नवी दिल्ली - दाक्षिणात्य अभिनेता राम चरण याच्या आयुष्यात मोठा आनंदाचा क्षण आला आहे. लग्नानंतर तब्बल १० वर्षांनी राम चरण आणि त्याची प्रेयसी उपासना यांना बाळ होणार आहे. राम चरण यांची पत्नी गर्भवती आहे. लवकरच या जोडप्याच्या घरी पाळणा हलणार आहे. त्यामुळे सध्या राम चरण आणि त्याचे कुटुंबीय खूपच खुश आहेत.
कॉलेजमध्ये झालं होतं प्रेमराम चरण आणि पत्नी उपासना यांच्या घरी किलबिलाट ऐकायला येणार असल्याने चाहत्यांमध्येही आनंद आहे. हे कपल्स आणि त्यांची लव केमिस्ट्री जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. राम चरण आणि पत्नी उपासना यांची लवस्टोरी कॉलेजच्या दिवसापासून सुरू झाली होती. कॉलेजमध्येच राम चरणने उपासनाला ह्दय दिले. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली त्यानंतर हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. परंतु खास गोष्ट म्हणजे. राम चरण आणि उपासना या दोघांना आपण प्रेमात पडलोय हेच माहिती नव्हतं. परंतु आपल्या जवळची व्यक्ती दुरावली तर काय अवस्था होते हे सगळ्यांना माहिती आहे. तसेच राम चरण आणि उपासनासोबत घडलं.
नेहमी एकमेकांसोबत राहणारे राम चरण आणि उपासना अचानक वेगळे झाले. कारण राम चरणला परदेशात जावे लागले. अशावेळी राम चरण आणि उपासना यांच्यात दुरावा आला. परंतु दूर राहूनही दोघे संपर्कात राहिले. एकमेकांना मिस करू लागले. तेव्हा आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही ही भावना दोघांच्या मनात आली. तेव्हापासून दोघांनी नव्या नात्याची सुरूवात केली.
उपासनाविषयी मनातील भावना कळाल्यानंतर राम चरणने उशीर केला नाही. मायदेशी परतल्यानंतर त्याने उपासनासमोर प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले. अनेक वर्षांनी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या कुटुंबातील राजी झाले. कुठल्याही अडथळ्याविना धूमधडाक्यात विवाह पार पडला. २०१२ मध्ये या दोघांनी लग्न केले. या दोघांच्या लग्नाला १० वर्ष झाली. त्यानंतर आता हे दोघेही नव्या जबाबदारीसाठी सज्ज झाले आहेत.