ज्येष्ठ तबलावादक शफात अहमद खान यांना पंचम निषादतर्फे सुरेल सांगीतिक आदरांजली वाहण्यात येणार असून ही मैफल रविवार, २४ जुलै २०१९ रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून दादर, शिवाजी पार्क येथील वीर सावरकर मार्गावरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे रंगणार आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात प्रसिद्ध गायक रमाकांत गायकवाड यांचा सुरेल सुरावटींचा नजराणा रसिक श्रोत्यांना अनुभवायला मिळणार आहे व त्यांना संवादिनीवर साथ देण्यासाठी अभिनय रवांदे तर, तबल्याची साथ देण्यासाठी रमाकांत करंबेळकर उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध तबलावादक पंडिता अनुराधा पाल यांचा सोलो वादनाचा परफॉर्मन्स सादर होणार असून त्यांना कीबोर्ड वर तुषार रातुरी साथ करणार आहेत.
तबल्यावर अक्षरशः बरसणाऱ्या शफात भाई यांच्या कलापूर्ण बोटांनी आणि आपल्या कलेने संगीताला अक्षरशः जिवंत करण्याच्या त्यांच्या कौशल्याने जगभरातल्या संगीतप्रेमींची मने त्यांना जिंकून घेतली होती. केवळ तालबद्ध तबल्याच्या परफॉर्मन्समधूनच नव्हे, तर तालाला सुरेलपणाची जोड देऊनही त्यांनी रसिक श्रोत्यांच्या मनावर जादू केली. तबल्याच्या तालामध्येही स्वरांचा सुरेल संगम साधणाऱ्या काही मोजक्या कलाकारांपैकी ते एक होते. अशा अद्वितीय संगीतकाराची व वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तीमत्वाची स्मृती कायम जीवंत ठेवणे हीच त्यांना दिलेली खरी मानवंदना ठरते.