महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आणि मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे आदेश बांदेकर. मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेल्या आदेश बांदेकरांनी कठीण परिश्रम आणि अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं नाव कमावलं. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. अभिनयाबरोबरच ते राजकारणातही सक्रिय आहेत. आदेश बांदेकरांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग आणि किस्से सांगितले.
लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये आदेश बांदेकर यांनी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांबद्दलही भाष्य केलं. ते म्हणाले, "अभुदय नगरमधील बालपण असल्याने माझ्यावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव होता. मला पहिल्यापासूनच त्या कुटुंबाबद्दल आकर्षण. माझा जन्म १९६६ सालातील आणि शिवसेनेची स्थापनाही त्याच वर्षातील आहे. मी मोठं होत असताना लालबाग, अभुदय नगर येथे शिवसेना वाढत होती. बाळासाहेबांचं भाषण, दसरा मेळाव्याला ढोल वाजवत जाणं, भगव्याचं आकर्षण...या सगळ्याचं आकर्षण होतं. आम्हाला बाळासाहेबांनी बोलवलं आहे, अशी स्वप्न पडायची. दसरा मेळाव्यात शेवटच्या कट्ट्यावर बसणारा एक शिवसैनिक साहेबांबरोबर स्टेजवर जातो. हा प्रवास होम मिनिस्टरमुळे जास्त सुखकर झाला. उद्धवसाहेबांसारखा माणूसपण जपलेला माणूस मला मिळाला. रश्मी वहिनी, आदित्य, तेजस या सगळ्यांबरोबर एक कुटुंब मला जोडता आलं."
"जेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं की आदेश तू आता पक्षासाठी काम केलं पाहिजे. तेव्हा मला खरंच वाटलं की स्वत:साठी जगत असताना दुसऱ्यासाठी धावलं पाहिजे. प्रचार, प्रसार करत असताना मी निवडणुकीलाही उभा राहिलो. फक्त १३ दिवस उरलेले असताना मला साहेबांनी निवडणूक लढवायला सांगितली. त्या निवडणुकीत माझा पराभव झाला होता. आणि मी मनोरंजन क्षेत्र सोडलं होतं. त्यानंतर माझ्याकडे काहीच काम नव्हतं. तेव्हा माझ्या डोक्यावर कर्ज होतं. मग एक दिवस मला बाळासाहेबांनी बोलवलं. ते मला म्हणाले आदेश तुला काय हवं ते माग पण, मला एक वचन दे की तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीच कमी होणार नाही. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की मला फक्त आशीर्वाद द्या. कारण, कलाक्षेत्रात मी मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करतोय, मेहनत हा माझा स्वभाव आहे. मी हसत राहणार आणि लोकांना हसवत राहणार, असं मी त्यांना म्हणालो होतो. हे त्या कुटुंबाकडे आहे. जे कोणाला दिसणार नाही. मी तेच माणूसपण उद्धवजींमध्ये बघितलं आहे. त्यांच्याकडून मी कोणाचं वाईट व्हावं असं कधीच ऐकलं नाही. ते गप्प राहतील पण, कोणाचं वाईट व्हावं असं ते कधीच बोलणार नाहीत. आदित्य, तेजस तर नाहीच...आणि रश्मी वहिनी तर माऊलीच आहेत. मी त्या कुटुंबाला बघितलं आहे. म्हणून मी त्यांच्याबरोबर काम करायचं ठरवलं आणि करत आहे," असंही त्यांनी सांगितलं.