Join us

आता या सगळ्यांना पोहोचवण्याची वेळ आलेली आहे! मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर भडकले आदेश बांदेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 15:58 IST

कलाकारांबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर आदेश बांदेकर चांगलेच भडकले आहेत. आदेश बांदेकर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांनी होम मिनिस्टर कार्यक्रमातून चाहत्यांची मनं जिंकून घेतली. यांच्यावर आजही चाहते भरभरुन प्रेम करतात. आदेश बांदेकर हे सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. अनेक अपडेट्स ते चाहत्यांना देत असतात. पण, आता आदेश बांदेकरांनी शेअर केलेल्या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कलाकारांबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर आदेश बांदेकर चांगलेच भडकले आहेत. 

आदेश बांदेकर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते त्यांच्या तब्येतीबाबत अपडेट देताना दिसत आहेत. ते म्हणतात, "नमस्कार, मी आदेश बांदेकर...मी अत्यंत व्यवस्थित आहे आणि सुदृढ, सुखरुप प्रवास करतो आहे. कारण, इतक्या जणांचे मला फोन येत्यात...अत्यंत काळजीपोटी, प्रेमापोटी...आणि जे संपर्क साधू शकत नाहीयेत म्हणून हळहळ व्यक्त करत्यात. कारण, कारणही तसंच आहे. आपले खूप हितचिंतक असतात. तसंच कुणीतरी अत्यंत अतृप्त भावनेने वेगवेगळ्या बातम्या पसरवतं. आता ही वृत्ती आहे. याला कुणीच काही करू शकत नाही. पण, बातम्या पसरवत असताना अगदी आदेश बांदेकरांच्या हृदयाचे ठोके मंदावले इथपासून ते अगदी निधनापर्यंत...म्हणजे श्रद्धांजलीही काही जणांनी अर्पण केल्यासारखी ही भावना ही वृत्ती...माझ्यापर्यंत होतं तोपर्यंत ठीक होतं. मी या सगळ्या गोष्टीकडे हसण्यावारी दुर्लक्ष केलं". 

"पण, आता मी सोशल मीडियावर पाहिलं तर मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज, कलावंत जे काम करत्यात त्यांच्या बद्दलच्या बातम्यादेखील अशाच होत्या. म्हणजे कुणाचा घाटात अपघात, कुणाच्या बसलाच अपघात...म्हणजे थेट पोहोचवण्यापर्यंत...आता या सगळ्यांना पोहोचवण्याची वेळ आलेली आहे, असं मला वाटतं. हे पोहोचवायचं असेल तर ही वृत्ती नाहीशी व्हायला पाहिजे. आणि ही वृत्ती नाहीशी करायची असेल तर व्ह्यू वाढवण्यासाठी इतरांच्या नावाचा वापर करून चार पैसे कमवण्याचा धंदा बंद पाडायचा असेल तर यांना रिपोर्ट केलं पाहिजे. ही वृत्ती अत्यंत घातक आहे. यामुळे कोणाच तरी नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या वृत्तीला श्रद्धांजली वाहावी, असं मला मनापासून वाटतं. २०-२५ मराठी सेलिब्रिटींबाबत अशी माहिती स्वत:च्या पेजवरुन टाकणाऱ्या वृत्तीला मी श्रद्धांजली अर्पण करतो. हसावं नाही तर काय करावं? ज्यांनी काळजी पोटी फोन केला त्या सगळ्यांना सांगतो मी व्यवस्थित आहे", असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.  

टॅग्स :आदेश बांदेकरमराठी अभिनेताटिव्ही कलाकार