स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत एकीकडे अरुंधती आणि आशुतोषची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत चालली आहे तर दुसरीकडे अनिरुद्ध त्या दोघांनी एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्न करतो आहे. दरम्यान आता देशमुखांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. त्याला कारणही तसे खास आहे. अनघा गरोदर असल्यामुळे सर्वजण खूश आहेत. मात्र अभिषेक नाराज झाल्याचे दिसत आहे.
नुकताच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. त्यात पाहायला मिळत आहे की, अरुंधती देशमुखांच्या बंगल्यात येते तेव्हा अनिरुद्ध अरुंधतीचे अभिनंदन करत तिला सांगतो की तू आजी होणार आहेस. हे ऐकल्यावर अरुंधती खूप खूश होते आणि अनघाला पेढा भरवण्यासाठी जात असते. इतक्यात अभिषेक बोलतो की मला हे मूल नको आहे. तू हाउसवाईफ होतीस, आमचे करिअर बाकी आहे अजून. त्यावर लगेच संजना म्हणते की, बरोबर बोलतोय अभि. त्यावर अरुंधती तिला गप्प बसवते आणि अभिला म्हणते की, तुम्ही जर माझ्या करिअरचा विचार केला असता ना तर तू आज या जगातही नसतास. अरुंधती आणि घरच्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर अभिषेक काय निर्णय घेणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.