'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका. अल्पावधीतच मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील अरुंधती प्रेक्षकांना आपल्याच घरातील वाटली. तर देशमुख कुटुंबीयांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली. ५ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता ही मालिका निरोप घेत आहे. या मालिकेचं शूटिंगही संपलं आहे. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी मालिकेत गौरी हे पात्र साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिनेदेखील हजेरी लावली होती.
मालिकेत यश आणि गौरीची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. ही भूमिका गौरी कुलकर्णीने साकारली होती. मात्र गौरीने अर्ध्यावरच मालिका सोडली होती. आता शूटिंगच्या शेवटच्या दिवशी तिने सेटवर हजेरी लावली होती. मालिका संपल्यानंतर गौरीने भावुक पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर ऑडिशनचा व्हिडिओ शेअर करत गौरीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. "Audition ला घातलेला dress परत farewell ला घातला… कारण गौरीतली ‘गौरी’ कायम माझ्यासोबतच होती. आज निरोप देताना emotional पण वाटतंय आणि आनंदही होतोय… या show ने मला सर्व दिलं… ओळख दिली… खुप चांगली माणसं दिली, अनेक अनुभव दिले… आणि तुमचं भरभरुन प्रेम दिलं..", असं गौरीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे ती म्हणते, "आयुष्याच्या वहीत दुमडून ठेवलेलं खूणेचं पान म्हणजे माझ्यासाठी ‘आई कुठे काय करते’ ही सिरियल होती आणि राहील. नेहमीच खास राहील". गौरीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 'आई कुठे काय करते'मधून एक्झिट घेतल्यानंतर चाहत्यांनी गौरीला मिस केलं होतं.
२३ डिसेंबर २०१९ रोजी 'आई कुठे काय करते' मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित करण्यात आला होता. मधुराणी प्रभुलकरने या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारली. तर मिलिंद गवळी अनिरुद्ध आणि रुपाली भोसले संजनाच्या भूमिकेत होती. अपूर्वा गोरे, निरंजन कुलकर्णी, अभिषेक देशमुख या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. आता ५ वर्षांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.