आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे पुन्हा एकदा अशाच एका वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मंत्रालयात आले असता, एका महिला पत्रकाराने त्यांना प्रतिक्रियेसाठी थांबवलं. पण आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो, असं म्हणत संभाजी भिडे यांनी त्या महिला पत्रकाराला सुनावलं. संभाजी भिडेंच्या या विधानाची सर्व स्तरातून निंदा होत आहे. अशात आता मराठमोळी अभिनेत्री राधिका देशपांडे (Radhika Deshpande) हिनेही यावर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत देविका हे पात्र साकारणाऱ्या राधिकाची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय.
वाचा, राधिकाची पोस्ट तिच्याच शब्दांत
बिंदू मात्र असलेली ही इवलीशी टिकली सध्या हेडलाईन्सच्या मध्यभागी आहे. खरंतर ही ‘फोरहेड’ म्हणजे कपाळाच्या मध्यभागी बघायला मिळते. अर्थातच स्त्रियांच्या! पण सध्या ती तिथून दिसेनाशी झाली आहे. कधीतरी दिसते, कधी पुसट, अधून मधून दिसते पण काहींनी ती दिसेनाशी व्हावी म्हणजे इतिहास जमा व्हावी असं चित्र रंगवणं सुरू केलं आहे. सध्या ही लाल, हिरव्या, भगव्या, गुलाबी, निळ्या अश्या विविध रंगात उपलब्ध आहे. टिकलीचा आकार वेळ, स्थळ, काळ आणि वयोपरत्वे बदलत असतो. बाजारात किमान १३० करोड पेक्षा जास्त त्यांची संख्या असावी. नाही का?काहींना त्यामुळे प्रश्न पडला आहे की हिला आपण संपुष्टात कसं आणायचं? इतिहास जमा अनेक वस्त्र, शस्त्र, अस्त्र, आभूषणं झाली. तसेच टिकल्या संपवूया म्हणून काही तक धरून आहेत. हिंदू राष्ट्र हे परिवर्तनशील आहे, मागचे धरून ठेवत नाही आणि नवीन पकडूनही ठेवत नाहीत. म्हणजे जीन्स प्यांट आहे पण त्यावर कुर्ती आहे. कुर्ती आहे पण त्यावर ओढणी नाही, ओढणी नसली तर स्टोल असतो पण टिकली? ती नाही आहे. का नाही आहे? अं हं... ते विचारायचं नाही कारण त्याची उत्तरं एकतर समाधानकारक मिळणार नाहीत, किंवा अर्थशून्य अर्धवट भासू शकतील. अगदी परिधान केलेल्या वेशभूषा आणि केशभूषे प्रमाणे.बाई, बाली, बायको ह्यांची वेगवेगळी मते टिकून आहेत.उत्तरं साधारणत: अशी मिळतील...मला टिकली चांगली दिसत नाही.शेजारची पण आजकाल टिकली लावत नाही.ती सध्या ‘इंन फॅशन’ नाही.बॉलिवूड मधे तरी कुठे लावते ती नटी.टिकल्यांमध्ये चांगले ऑप्शन्स नाहीत.आपले नवरे कुठे लावतात आपल्या नावाचं काही मग आपणच का लावायची?टिकल्या लावलेल्या बायका फारच बाळबोध आणि ग्रामीण दिसतात.टिकल्या लावलेल्या मुलींकडे मुलं बघत नाहीत.टिकली लावून आपण बावळट वाटतो.कशाला पाहिजे आहे टिकली फिकली. छान मॉडर्न राहावं बाईनी.खरंतर टिकली हा वादाचा, चर्चेचा विषय नसून लावण्याचा विषय आहे.टिकली ज्याला आवडते तिने ती लावावी. लावायचा आग्रह असावा, हरकत नसावी, जबरदस्ती नसावी. एवढे स्वातंत्र्य आपल्याला आहेच...., असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.