'आई कुठे काय करते' फेम अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकरनं मालिकेतून घेतला ब्रेक, समोर आलं मोठं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 10:56 AM2022-10-28T10:56:37+5:302022-10-28T10:57:15+5:30
Aai Kuthe Kay Karte Fame Madhurani Prabhulkar : अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने सध्या ब्रेक घेतला आहे. त्यामागचं मोठं कारण समोर आलं आहे. खुद्द तिनेच याबाबतचा खुलासा केला आहे.
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. सध्या अरुंधती यशाकडे वाटचाल करताना दिसते आहे. तसेच ती आशुतोषसोबत लग्न करणार का,याचा देखील मालिकेत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. त्यात अरुंधती गायनाच्या कार्यक्रमाच्या दौऱ्यावर गेल्याचं मालिकेत दाखवलं आहे. खरेतर अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर(Madhurani Prabhulkar)ने सध्या ब्रेक घेतला आहे. त्यामागचं मोठं कारण समोर आलं आहे. खुद्द तिनेच याबाबतचा खुलासा केला आहे.
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरांच्या पतीचीही फसवणूक झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. प्रमोद प्रभुलकर यांना १७ हजारांना गंडा घातला आहे. तर इतरांना लाखोंचा गंडा घातलाय. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी गणपतीपुळेला जाण्यासाठी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने हॉटेल बूक केले होते. गणपतीपुळे येथील ग्रीनलीफ रिसोर्ट हॉटेल त्यांनी दोन दिवसासाठी १७ हजार रुपये देऊन बूक केले होते. मात्र तेथे पोहचल्यावर त्या हॉटेलच्या खात्यावर रक्कम जमा झाली नसल्याचं कळलं. अशाप्रकारे अनेकांची फसवणूक झाल्याचं प्रमोद प्रभूलकर यांनी सांगितले.
दरम्यान या सर्व प्रकारावर मधुराणीने इंस्टाग्रामवर सांगितले की, नमस्कार मित्र मैत्रिणींनो, गेले ५ महिने मी जाणीपूर्वक सोशल मीडिया वर कार्यरत नाही. पण काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी मी ही पोस्ट लिहीत आहे. कालपासून ' मधुराणी प्रभुलकर ह्यांना हजारोंचा गंडा ' ' मधुराणी प्रभुलकर ह्यांची फसवणुक ' , अशा बातम्या काही वृत्तपत्रांच्या पोर्टल्स वर येत आहेत. पण वास्तवात त्यात नमूद केलेल्या गणपतीपुळे येथील हॉटेल मध्ये मी स्वतः गेलेलेच नाही.
तिने पुढे सांगितले की, माझी एक छोटी सर्जरी झाली असल्याकारणाने मालिकेतूनही काही दिवसांची रजा मागून घेऊन मी पुण्यातील माझ्या घरी विश्रांती घेत आहे. आता माझी तब्येत बरीच बरी आहे. आणि लवकरच की मालिकेतून आपल्याला पुन्हा भेटेन. गणपतीपुळ्यातील हॉटेलमध्ये माझी लेक स्वराली आणि प्रमोद दोघेच गेले आहेत. तिथे त्यांच्याबरोबर जे घडले ते अत्यंत चूक आहे. काल या सगळ्या मनस्तापामुळे प्रमोदची तब्येत सुद्धा बिघडली आहे. पण दोघे सुखरूप आहेत. त्यांच्या प्रमाणे इतर सुद्धा अनेक जण फसवले गेले आहेत. याचा लवकरात लवकर तपास लगायला हवा आणि या सगळ्यांचे पैसे परत मिळायला हवेत. मला आज सकाळासून शेकडो मेसेजेस व फोन येत आहेत. पत्रकारांनी नीट माहिती न घेता केवळ माझ्या नावाचा वापर करून हेड लाईन छापली आहे. या बेजबाबदारपणाचा खेद आणि निषेध.