Join us

कोणी म्हणायला नको म्हणून...; मिलिंद गवळींनी सांगितला अलका कुबल यांच्याबद्दलचा खास किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 4:50 PM

Milind Gawali post : अलका कुबल  यांची मुलगी ईशानी हिचा नुकताच विवाहसोहळा पार पडला. मिलिंद गवळीही या लग्नाला हजर होते. या लग्नाच्या निमित्ताने मिलिंद गवळी यांनी पोस्ट शेअर करत, एक  खास आठवण सांगितली आहे.  

स्टार प्रवाह वाहिनीवरील  ‘आई कुठे काय करते’  (Aai Kuthe Kay Karte) या लोकप्रिय मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारणारे अभिनेता मिलिंद गवळी (Milind Gawali) यांची एक पोस्ट सध्या जाम चर्चेत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री अलका कुबल  यांची मुलगी ईशानी हिचा नुकताच विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. मिलिंद गवळीही या लग्नाला हजर होते. या लग्नाच्या निमित्ताने मिलिंद गवळी यांनी पोस्ट शेअर करत, एक  खास आठवण सांगितली आहे.  अलका कुबल (Alka Kubal) यांनी आपलं काम सांभाळत मुलींचा कसा सांभाळ केला, हे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे.त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय.

मिलिंद गवळी यांची पोस्ट- माणसाच्या आयुष्यात सगळ्यात मौल्यवान किंवा जीव की प्राण काय असेल तर ती असते "लेक"लेकी कशा पटकन मोठ्या होतात , आणि एक राजकुमार येतो, दोघ उंच भरारी घेतात, आपण आनंदानं त्यांचं उडणं पहात राहायचं.समीर आठले आणि अलकाताई ची लेक ईशानी ती खरच एक पायलेट आहे आणि तिचा विवाह ज्याच्याशी झाला निशांत वालिया तोसुद्धा पायलेटच आहे. म्हणजे खरंच ते आकाशात दोघेही भरारी घेतात. ईशानी परदेशात विमान चालवायचं प्रशिक्षण घेण्यासाठी निघाली होती तेव्हा मी तिला म्हणालो होतो एक दिवस मला तु जे विमान चालवतेस त्या विमानाने प्रवास करायचा आहे.

माझ्या काही स्वप्नात पैकी ते एक स्वप्न आहे. लेकी जेव्हा अशा भरारी घेतात, यशस्वी होतात, त्यामागे आई-वडिलांचे खूप परिश्रम असतात, आईचे थोडे जास्तच. मी आणि अलकाताई गेली वीस वर्ष एकत्र सिनेमांमध्ये काम करत आहोत, हमसे प्रोफेशनल रिलेशन तर आहेतच पण त्यापेक्षाही फॅमिली रिलेशन जास्तच, ईशानी आणि कस्तुरीला मी त्यांच्या लहानपणापासून ओळखतो, अलका ताई आणि समीर ने त्यांच्यावर जे संस्कार केले आहेत, ते मी अनेक वर्ष जवळून पाहात आलोय,आपण आदर्श ठेवावा असं हे दांपत्य आहे,

दोघेही नवरा बायको कर्तृत्वाने खूप मोठे आहेत, पण माणूस म्हणून ते त्याच्यापेक्षाही अनेक पटीने महान आहेत, अनेक कुटुंबांना त्यांनी वर्षानुवर्ष पोसली सांभाळली आहेत.अनेक वर्ष सिनेमांमध्ये काम करून सुद्धा ते दोघ कधीही फिल्मी झाले नाहीत.कामानिमित्ताने सातत्याने दोघांना महाराष्ट्रभर फिरावं लागत होतं पण एक घार  जशी आपल्या पिल्लांवर आकाशातून नजर ठेवत असते तसंच समीर आणि अलका ताईंनी दोन्ही मुलींकडे पूर्ण लक्ष देऊन त्यांना घडवलं. अलकाताईचं एक उदाहरण मी माझ्या जन्मात कधी विसरणार नाही. नागपूरला मराठा बटालियन या सिनेमाचं शूटिंग ला ईशानि आणि कस्तुरी ला घेऊन आल्या होत्या. चित्रपटाचा समीरच कॅमेरामन होता. मुली लहान होत्या , शूटिंग संपवून आम्ही एअरपोर्ट ला निघालो होतो.

अर्ध्या रस्त्यावर अलकाताईनी गाडी वळवायला सांगितली. ज्या गेस्टहाऊस मध्ये आम्ही उतरलो होतो त्या गेस्टहाऊस मध्ये परत घ्यायला सांगितलं. माझं महत्त्वाचं काम राहील ,जावंच लागेल गेस्टहाऊसवर. अलकाताईनी पटकन पन्नास-शंभर रुपये काढून प्रोडक्शन वाल्याला दिले. मी विचारलं एवढ्या साठी आपण का परत आलो.

अलका ताईंचे उत्तर ऐकून मी थक्क झालो. ताई म्हणाल्या सकाळी दूध मागवलं होतं मुलींसाठी त्याचे पैसे द्यायचे राहून गेले होते. मी म्हणालो त्यात काय एवढ? अलकाताई म्हणाल्या, कोणी म्हणायला नको , अलका ताईंच्या मुलींचे दुधाचे पैसे आम्ही दिले म्हणून.ईशानी आणि निशांत खूप खूप आशीर्वाद.

टॅग्स :मिलिंद गवळीअलका कुबलआई कुठे काय करते मालिका