मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी एकेकाळी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 'देवकी', 'माहेरची माया', 'सून लाडकी सासरची', 'सख्खा भाऊ पक्का वैरी', 'दुर्गा म्हणत्यात मला' अशा सुपरहिट मराठी चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे. सिनेसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या मिलिंद गवळींनी मालिकांमध्येही काम केलं. 'आई कुठे काय करते' या मालिकेतील त्यांची अनिरुद्ध ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. नुकतंच मिलिंद गवळींनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली.
मिलिंद गवळींनी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत व्यसनाबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, "मी एक नंबरचा व्यसनी आहे. पण, मला असलेलं व्यसन हे अभिनयाचं आहे. लोकांना अभ्यासाचं व्यसन असू शकतो. तेंडुलकरला क्रिकेटचं व्यसन आहे. त्यामुळे व्यसनासाठी केमिकल घ्यायची गरज नाही, असं मला वाटतं. ज्यामुळे तुमच्या शरीराचं, आजूबाजूच्या लोकांचं नुकसान होतं, अशी व्यसनं करण्याची गरज नाही."
"सिगारेट पिणारे लोक मला आवडत नाही. ऑक्सिजन घ्यायचं सोडून तुम्ही निकोटिन आणि कार्बन डायऑक्साइड का घेता? फुप्फुसांना धूर का देता? त्यानंतर माझ्या लक्षात आलं की सिगारेट ओढणं हा प्राणायमचा प्रकार आहे. त्यामुळे अनेक लेखक आणि कलाकार सिगारेट ओढताना दिसतात. त्यांनी एकाग्रतेसाठी ही सवय स्वत:ला लावून घेतली आहे असं मला वाटतं. पण, मला वाटतं यापेक्षा तुम्ही श्वासाचा व्यायाम केला, तर या गोष्टींची तुम्हाला गरज भासणार नाही. लोक मोबाईलची काळजी घेतात. आयफोन असेल तर आणखी जपतात. मग, आपल्या शरीराची काळजी आपण का घेत नाही?", असंही पुढे मिलिंद गवळी म्हणाले.