Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका. 725 एपिसोडनंतरही या मालिकेची लोकप्रियता कायम आहे. टीआरपी चार्टमध्ये अव्वल स्थान टिकवून असलेल्या या मालिकेच्या यशामागचं खरं रहस्य काय आहे माहितीये? तर टीमची मेहनत. होय, फक्त कलाकार मंडळीच नाही तर मालिकेच्या टीममधील प्रत्येक जण पडद्यामागे राबराब राबतात. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा.‘आई कुठे काय करते’मध्ये अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी सेटवरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आहे, मालिकेचे सिनेमेट्रोग्राफर राजू देसाई यांचा. मालिकेच्या सीन अधिकाधिक जिवंत बनवण्यासाठी राजू देसाई कसे झटत आहेत हे या व्हिडीओत दिसतंय.
राजू देसाई हे एक सीन चक्क टेम्पोवर चढून शूट करत आहेत. मिलिंद गवळी यांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. ‘आज आमचं शूटींग पार्किंग लॉटमध्ये होतं. अनेक कलाकार होते. त्यामुळे राजू देसाई यांना टॉप शॉट हवा होता. क्रेन नव्हती. मग राजू देसार्इंनी चक्क टेम्पोवर चढून हा सीन शूट केला. हेच आमच्या यशाचं खरे आधारस्तंभ आहेत. म्हणूनच आई कुठे करते ही मालिका 725 एपिसोडनंतरही इतकी लोकप्रिय आहे,’असं मिलिंद गवळी यांनी व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
स्टार प्रवाहावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका तुफान लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका सतत टीआरपी रेसमध्ये पहिल्या आणि दुस-या क्रमांकांवर असते. यावरुन मालिकेची लोकप्रियता लक्षात येते. मालिकेत सध्या फारच रंजक ट्रॅक सुरु आहे. मालिकेत यशचा मित्र नील ईशासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो. यश हा प्रयत्न उधळून लावतो आणि यादरम्यान त्यांच्यामध्ये झटपट होते. आणि नीलचा मृत्यू होतो. त्यांनतर पोलीस यशला ताब्यात घेतात.