भारताची राजधानी दिल्लीत सिनेमा आणि वेब सीरिजचं शूटिंग करणं आता कठीण होत चाललंय. मध्य प्रदेश किंवा इतर राज्यात दिल्लीचा सेट उभारुन अनेक सिनेमांचं शूट होत आहे. याला कारण म्हणजे दिल्लीतील वाढती महागाई. याचा फटका आमिर खान (Aamir Khan), अजय देवगण (Ajay Devgn) सारख्या अभिनेत्यांनाही बसला आहे. आमिरचा 'सितारे जमीन पर' आणि अजय देवगणच्या 'रेड 2' चं शूट आता दिल्लीबाहेरच होत आहे.
दिल्लीत वाढती महागाई पाहता आमिर खान आणि अजय देवगणने आपल्या आगामी सिनेमांचं शूटिंग लोकेशनच बदललं आहे. आता त्यांचे सिनेमे मध्यप्रदेश किंवा उत्तर प्रदेशमध्ये शूट होतील. आमिरच्या 'सितारे जमीन पर' सिनेमाचं बरेच दिवसांचं शूट आधी दिल्लीत शेड्युल झालं होतं. मात्र नंतर ते कमी करण्यात आलं. दिल्लीत मेट्रो स्टेशन ते पार्किंग अशा सगळ्याच ठिकाणचं भाडं आता लाखांच्या किंमतीत गेलं आहे. हिंदुस्तान टाईम्स रिपोर्टनुसार, दिल्लीतील राजीव चौक मेट्रो स्टेशनवर प्रत्येक तासासाठी २ लाख रुपये मोजावे लागत आहे. तर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १२ लाख प्रतितास इतकं भाडं आहे.
एका प्रोडक्शन हेडच्या सांगण्यानुसार, जर तुम्ही राजीव चौकात ४ तास शूटिंग करत असाल तर याचा अर्थ दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला तुम्हाला ८ लाख रुपये द्यावे लागतील. जीएसटीची गोष्ट नाही केली तरी २ लाख ३६ हजार रुपये नवी दिल्ली पालिका परिषदेला द्यावे लागतील तर १ लाख रुपये पार्किंगसाठी मोजावे लागतील. दिल्ली पोलिसांना सुरक्षेसाठी सुमारे २ लाख रुपये द्यावे लागतात. त्यामुळे यावरुन महागाईचा अंदाज येईल.
आमिरचा 'सितारे जमीन पर' दिल्लीत १ महिने शूट होणार होतं. पण आता जुलैत केवळ ८ ते १० दिवसांसाठी शूट होईल. जान्हवी कपूरच्या 'उलझन' सिनेमाचं शूट नुकतंच पूर्ण झालं आहे. सिनेमाचं लंडन शेड्युल वाढल्याने बजेट तिथेच संपलं. त्यामुळे दिल्लीतील शेड्युल भोपाळला शिफ्ट करण्यात आलं. सिनेमात भोपाळमध्येच दिल्लीचा सेट लावण्यात आला.