Join us

दोघांना खूप समजावलं पण...; आमिर व किरणच्या घटस्फोटाबद्दल बोलला मित्र अमीन हाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2021 10:35 AM

Aamir khan Kiran Rao divorce : अमीन हाजी हा आमिर व किरणचा जवळचा मित्र आहे. 2005 मध्ये किरण व आमिर यांनी लग्न केलं तेव्हा अमीन हाजी या लग्नाला हजर होता.

ठळक मुद्दे२८ डिसेंबर २००५ रोजी या दोघांचे लग्न झाले. आमिर आणि किरण दोघांनी घटस्फोटाबाबत निवेदन प्रसिद्ध करत यासंंबंधीची माहिती दिली.

आमिर खान (Aamir Khan) व किरण राव  (Kiran Rao)यांच्या घटस्फोटाच्या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. काल शनिवारी सोशल मीडियावर एक स्टेटमेंट जारी करत या कपलनं घटस्फोटाबद्दल माहिती दिली होती. आता आमिर खानकिरण रावचा मित्र अभिनेता अमीन हाजी  (Amin Hajee)  या कपलच्या घटस्फोटावर बोलला आहे. (Aamir khan Kiran Rao divorce)2005 मध्ये किरण व आमिर यांनी लग्न केलं तेव्हा अमीन हाजी या लग्नाला हजर होता. 

मी दोघांना खूप समजावलं...आमिर व किरणने मला व माझ्या पत्नीला त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयाबद्दल सांगितलं, तेव्हा आम्ही या विषयावर बरीच चर्चा केली होती. त्या दिवशी आम्ही त्यांना दिलासा देण्याऐवजी, तेच दोघं आम्हाला दिलासा देत होते. आम्ही आमच्यापरीने त्या दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न केला. पण दोघांचाही निर्णय झाला होता. तो फायनल होता. त्यामुळे आम्हाला त्यांच्या निर्णयाचा आदर करावाच लागला. लग्न संपुष्टात आलं पण आमच्या दोघांतील मैत्री कायम राहिल, असं आश्वासन आमिर व किरणनं आम्हाला दिलं आहे आणि मला विश्वास आहे की कायदेशीररित्या ते दोघं विभक्त झाले असले तरी त्यांच्या नात्यातील आदर व प्रेम कायम राहिल, असं अमीन हाजी म्हणाला.

आमिर आणि किरण दोघांनी घटस्फोटाबाबत स्टेटमेंट जारी केलं होतं. ‘आम्ही 14 वर्ष एकत्र काढली. आम्ही प्रत्येक क्षण आनंदानं जगलो आणि आमच्या नात्यात विश्वास, आदर आणि प्रेम वाढतच गेलं. आता आपण आपल्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू करू. हा अध्याय पती- पत्नीसारखा नसेल, पण सह-पालक आणि कुटुंब म्हणून आपण एकत्र असू. आम्ही काही महिन्यांपूर्वी वेगळं होण्याचा विचार केला होता. आता अधिकृतरित्या वेगळे होत आहोत. आम्ही मुलगा आझादचे  पालक असू आणि एकत्र त्याची काळजी घेऊ. आम्ही सिनेमांसाठी आणि आपल्या पानी फाऊंडेशनसाठी एकत्र काम करत राहू,’ असं त्यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.

 

टॅग्स :आमिर खानकिरण राव