किरण राव (Kiran Rao) दिग्दर्शित 'लापता लेडिज' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. हटके कथानक आणि दमदार ट्रेलरमुळे लापता लेडिजची उत्सुकता शिगेला आहे. किरण राव या सिनेमाचं दिग्दर्शन करतेय. सर्वांना माहितच आहे की, किरण ही मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची (Aamir Khan) पूर्वपत्नी आहे. सध्या किरण 'लापता लेडिज' (Laapata Ladies) च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानिमित्ताने किरण सिनेमासंबंधी अनेक खुलासे करत आहे. 'लापता लेडिज'मधील एका भूमिकेसाठी आमिरने ऑडिशन दिल्याचा खुलासा किरणने केला. जाणून घ्या सविस्तर
ANI ला दिलेल्या मुलाखतीत किरण म्हणाली, "आमिरला 'लापता लेडिज'ची कथा खुप आवडली होती. त्याला सिनेमातली एखादी भूमिका करायची होती. इतकंच नव्हे तर आमिरने ऑडिशन सुद्धा दिली. पण मला वाटत होतं आमिर एक स्टार कलाकार आहे. त्यामुळे आमिरने भूमिका जरी साकारली तरी त्याचं स्टारपणाचं वलय त्या भूमिकेला मारक ठरेल. त्यामुळे त्या भूमिकेला साजेसा असाच कलाकार मला हवा होता. म्हणून मी आमिरला सिनेमात कास्ट केलं नाही."
किरण मुलाखतीत पुढे म्हणाली, "एका स्टार कलाकाराला सिनेमात कास्ट करण्याचा कोणताही विचार माझा नव्हता. सिनेमाच्या कथेला अनुसरुन ते योग्य नव्हतं. आमिरने सिनेमात जरी काम केलं नसलं तरीही त्याने मला खुप सपोर्ट केलाय. त्याला सिनेमाची कथा आवडली असल्याने नवोदित अभिनेत्यांना संधी देण्याचं त्याने मला सुचवलं. जेणेकरुन प्रेक्षक सिनेमाच्या कथेशी जास्त जोडले जातील. जेव्हा तुम्ही सिनेमात एखाद्या स्टार कलाकाराला बघता तेव्हा तुमच्या अपेक्षा वाढतात." 'लापता लेडिज' १ मार्च २०२४ ला रिलीज होतोय.