आमिर खान (Aamir Khan) सध्या ‘रिमेक किंग’ बनताना दिसतोय. नुकताच आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) रिलीज झाला. त्याचा हा सिनेमा ‘द फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूडपटाचा रिमेक होता. 180 कोटी खर्चून आमिरनं हॉलिवूडपटाचा रिमेक बनवला पण हा सिनेमा 60 कोटीही कमाई करू शकला नाही. बॉक्स ऑफिसवर ‘लाल सिंग चड्ढा’ची अशी गत झालेली पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. पण आमिरची बातचं न्यारी. झालं गेलं विसरून आता आमिर पुन्हा कामाला लागला आहे आणि पुन्हा एकदा एका विदेशी सिनेमाचा रिमेक बनवण्याची तयारी त्यानं सुरू केली आहे.
होय, चर्चा खरी मानाल तर ‘कॅम्पियोन्स’ या स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक आमिर घेऊन येतोय. ‘Campeones’ हा सिनेमा 2018 साली प्रदर्शित झाला होता आणि तुफान गाजला होता. मीडिया रिपोर्टनुसार, याच्या रिमेकवर आमिरने काम सुरू केलंय. ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना हा सिनेमा दिग्दर्शित करणार असल्याचीही चर्चा आहे. या सिनेमासाठी हिरोईनचा शोधही सुरू झाला आहे. यासाठी अनुष्का शर्माशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती मिळतेय. आमिर व अनुष्का ही जोडी याआधी ‘पीके’ या चित्रपटात दिसली होती.
‘पिपींग मून’ने दिलेल्या वृत्तानुसार, निर्मात्यांनी ‘Campeones’च्या रिमेकच्या प्री-प्रॉडक्शनचं काम सुरू केलं आहे. चित्रपटासाठी सहा महिन्यांचं शेड्यूल निश्चित करण्यात आलं आहे. सोनी पिक्चर्स हा सिनेमा प्रोड्यूस करणार आहे.
येत्या जानेवारीत आमिरच्या या नव्या चित्रपटाचं शूटींग सुरू होणं अपेक्षित आहे. कारण आमिर सध्या सुट्टी एन्जॉय करतोय. सध्या तो अमेरिकेत आहे. अमेरिकेतून परतल्यावरच तो शूटींग सुरू करेल. आमिरचा एक रिमेक फसला. बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला, अशात आणखी एका रिमेकची रिस्क आमिर घेतोय. आता यात त्याला किती यश मिळतं ते बघूच.